कर्मचाऱ्यांची उडाली ‘झोप’

By Admin | Updated: May 13, 2015 00:51 IST2015-05-13T00:10:54+5:302015-05-13T00:51:35+5:30

आयुक्तांकडून झाडाझडती : ११० जणांना ‘कारणे दाखवा’

Employees 'sleep' | कर्मचाऱ्यांची उडाली ‘झोप’

कर्मचाऱ्यांची उडाली ‘झोप’

कोल्हापूर : स्थळ : महापालिकेचे शिवाजी मार्केट कार्यालय... वेळ : दुपारी एकची. सर्वच कर्मचाऱ्यांना उन्हामुळे आलेली ग्लानी... नेहमीप्रमाणे निम्म्यांहून अधिक कर्मचारी वैयक्तिक कामासाठी कार्यालयाबाहेर... अधिकारी सकाळीच सही करून शहराच्या फिरतीवर गेलेले. यातच अचानक ‘आप का नाम क्या है... क्या काम करते हो... आज क्या-क्या किया बतायो’ अशा प्रश्नांची सरबत्ती करीत खुद्द आयुक्त पी. शिवशंकर यांनी मंगळवारी शिवाजी मार्केटमधील सर्वच कार्यालयांची झाडाझडती घेतली.
थेट आयुक्तच पुढ्यात उभे राहून हजेरी घेऊ लागल्याने कर्मचाऱ्यांची तर बोबडीच वळली. आयुक्तांनी ११० गैरहजर अधिकारी व कर्मचाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्याचे आदेश दिले. विभागीय कार्यालयांचे सक्षमीकरण व्हावे, यासाठी सहायक आयुक्तांना दोन-दोन विभागीय कार्यालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, इतर विभागांची जबाबदारी असल्याने या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण आहे. परिणामी ‘मिनी महापालिका’ ही संकल्पना कुचकामी ठरत आहे. यातच महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी कार्यालयात हजर नसतात. त्यामुळे नागरिकांची मोठी कुचंबणा होत असल्याच्या तक्रारी आयुक्तांपर्यंत पोहोचल्या. कनिष्ठ स्तरावरील तक्रारींसाठीही नागरिक मोठ्या संख्येने थेट भेटण्याचे प्रमाण अधिक असल्याचे आयुक्तांच्या गेल्या काही आठवड्यांच्या निरीक्षणावरून ध्यानात आले. अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहावे, असे आदेश देऊनही महापालिकेच्या मुख्य कार्यालयाशिवाय इतर विभागीय कार्यालयांत सुधारणा झाली नाही. त्यामुळेच थेट स्वत:च कार्यालयास अचानक भेटी देत, आयुक्तांनी कर्मचाऱ्यांची हजेरी घेतली. आयुक्तांच्या या दणक्याने महापालिकेतील पाच हजार कर्मचारी धास्तावून गेले.
आयुक्तांनी दुपारी सव्वा वाजण्याच्या सुमारास थेट शिवाजी मार्के ट गाठले. कोणतीही पूर्वसूचना न देता आयुक्त आल्याने संपूर्ण इमारतीमध्ये एकच खळबळ उडाली. सर्वांत प्रथम विभागीय कार्यालय क्रमांक दोन येथे त्यांनी भेट दिली. यानंतर राजीव आवास योजना, कार्यकारी अभियंता विभाग, राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान, विवाह नोंदणी कार्यालय, विधी विभाग, इस्टेट विभाग, विद्युत विभाग, प्रॉव्हिडंट फंड विभाग, पाणीपुरवठा, ड्रेनेज विभाग, आस्थापना व प्राथमिक शिक्षण विभाग, आदी कार्यालयास त्यांनी भेटी दिल्या. कोणतीही पूर्वसूचना न देता सर्व कार्यालयांत मिळून तब्बल ११० कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले. सहायक आयुक्त उमेश रणदिवे यांच्यासमवेत सर्व कार्यालयांतील कार्यविवरण वही, हालचाल रजिस्टर, आदींची तपासणी करीत आयुक्तांची ही झाडाझडती तब्बल दोन तास सुरू होती. यानंतर आयुक्तांनी महापालिकेच्या सर्व कार्यालयांतील अभिलेखांचे स्कॅनिंग व डिजिटलायझेशन करण्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. (प्रतिनिधी)


नागरिकांची गैरसोय करून कोणीही कर्मचारी व अधिकारी वैयक्तिक कारणास्तव कार्यालयाबाहेर जाण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. अशा प्रकारे सर्वच कार्यालयांची पूर्वकल्पना न देता अचानक तपासणी केली जाईल. याला लगाम घालण्यासाठी लवकरच अत्याधुनिक बायोमेट्रिक हजेरी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. सर्व क र्मचाऱ्यांची इत्थंभूत माहिती थेट आयुक्त कार्यालयात एका क्लिकवर कळेल. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांना जलद व तत्काळ सेवा देण्यावर भर राहील.
- पी. शिवशंकर,
आयुक्त



कार्यविवरण नोंदवही कोणत्या गावात असते ?
प्रत्येक कर्मचाऱ्याची कार्यालयातील व बाहेरील कामकाजाची दैनंदिन नोंद असणारी कार्यविवरण व हालचाल नोंदवही सर्वच शासकीय कार्यालयांत असते. मात्र, महापालिकेच्या बहुतांश कर्मचाऱ्यांना कार्यविवरण नोंदवही नावाचा काही प्रकार असतो, याची कल्पनाच नसल्याचे आयुक्तांच्या पाहणीत आढळून आले.


आयुक्त कार्यालयात आल्याचे समजताच इतर विभागांतील कर्मचाऱ्यांनी तातडीने आपल्या वरिष्ठांना फोन लावून कार्यालयात येण्याचा निरोप दिला. त्यामुळे घरी निवांत ‘वामकुक्षी’ घेत असलेल्या अनेक अधिकाऱ्यांना उन्हातून धावतच कार्यालय गाठावे लागले. धावत-पळत कार्यालयात आलेल्या या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिवसभर तणाव जाणवत होता.


आयुक्तांनी प्रत्येक कार्यालयाची वरवर पाहणी केली नाही. कार्यालयात जाताच उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना एका बाजूला उभे केले. यानंतर उमेश रणदिवे यांना रजिस्टरप्रमाणे कर्मचाऱ्यांची नावे घेऊन हजेरी घेण्यास सांगितले. यानंतर नावापुढे गोल चिन्ह करीत कर्मचाऱ्यांच्या संख्येबाबत खात्री करून घेतली. आयुक्तस्तरावरील अधिकाऱ्याने अशा प्रकारे कार्यालयाची हजेरी घेण्याचा हा महापालिकेच्या इतिहासातील पहिलाच प्रकार असल्याची चर्चा होती.

Web Title: Employees 'sleep'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.