आयजीएम दवाखान्याकडील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

By Admin | Updated: July 10, 2017 17:47 IST2017-07-10T17:47:42+5:302017-07-10T17:47:42+5:30

तीन महिने पगार नसल्याचा परिणाम, दवाखाना हस्तांतरणाची प्रक्रिया लांबली

Employees of IGM clinic and workers stopped work | आयजीएम दवाखान्याकडील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

आयजीएम दवाखान्याकडील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

  आॅनलाईन लोकमत

इचलकरंजी , दि.१0 : शासनाकडे हस्तांतरीत झालेल्या आयजीएम हॉस्पिटलकडील डॉक्टरसह सर्व कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन सुरू केले. एप्रिल महिन्यापासून पगार मिळाला नसल्यामुळे वेतन मिळेपर्यंत काम बंद आंदोलन चालू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, नगरपालिकेच्यावतीने कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी मध्यस्थी करण्याचा केलेला प्रयत्न असफल झाला.

नगरपालिकेचे आयजीएम हॉस्पिटल २८ फेब्रुवारीपासून शासनाकडे हस्तांतरीत झाले आहे. दवाखान्याकडील अधिकारी व कर्मचारी यांची निवड करण्यासाठी नेमलेल्या समितीने दवाखान्याकडील ७० कर्मचाऱ्यांना शासनाच्या आरोग्य विभागाकडे सेवेत घेतले आहे. मात्र, दवाखान्याची हस्तांतरीत करण्याची प्रक्रिया कमालीची लांबली आहे. त्याचा परिणाम म्हणून एप्रिल महिन्यापासून दवाखान्याकडे असलेल्या डॉक्टर व अधिकारी यांचा पगार झालेला नाही. आयजीएम दवाखान्याचे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत नगरपालिकेने अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार काढावा, असे आरोग्य खात्याने सांगितले असले तरी नगरपालिकेकडे एप्रिल महिन्यापासून पगाराच्या रकमेची तरतूद नसल्याने त्यांचा पगार करता येत नाही, असे नगरपालिकेने स्पष्ट केले आहे. अशा स्थितीत जून महिन्याच्या अखेरीस आरोग्य मंत्री दीपक सावंत यांच्याकडे झालेल्या बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न त्वरित सोडवावा, असे निर्देश मंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिले होते. त्यानंतर ४ जुलै रोजी आयजीएमकडील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नगरपालिकेवर मोर्चा काढून मुख्याधिकाऱ्यांना पगाराविषयी निवेदन दिले होते. आणि त्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी व आरोग्य उपसंचालक यांच्याकडे जाऊन या प्रश्नाबाबत ताबडतोब निर्णय घ्यावा, असे सांगितले होते. अन्यथा १० जुलैपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दवाखान्याकडील सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनास सुरूवात केली.

दवाखान्याकडील सर्वांना वेतन मिळेपर्यंत आपत्कालीन विभाग वगळता सर्व विभाग बंद ठेवण्यात येतील, अशी घोषणा यावेळी करण्यात आली. दवाखान्याच्या इमारतीसमोर येऊन घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली आणि ठिय्या आंदोलनास सुरूवात केली. नगरपालिकेचे कामगार अधिकारी विजय राजापुरे यांनी आंदोलनस्थळी येऊन मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पगार मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. दवाखान्याच्या इमारतीसमोर आंदोलन सुरू असल्यामुळे दवाखान्याकडील मात्र सर्व विभागांकडील कामकाज ठप्प झाले होते. अचानकपणे सुरू झालेल्या आंदोलनामुळे अनेक रुग्णांना परत जावे लागले.

आयजीएम, वारणा व कचराप्रश्नी दिरंगाई

आयजीएम दवाखान्याचे शासनाकडे हस्तांतरण, वारणा नळ योजना, कचरा उठाव व घनकचरा व्यवस्थापन अशा मुद्द्यांवर आमदार सुरेश हाळवणकर यांनी विधानसभा व नगरपालिकेची निवडणूक लढविली होती. तीनही जीवनावश्यक नागरी सुविधांसाठी होणाऱ्या दिरंगाईमुळे नागरिक अस्वस्थ आहेत. म्हणून आमदार हाळवणकर यांनी जातीने लक्ष घालून तीनही प्रश्न त्वरित सोडवावेत, अशी मागणी होत आहे.

Web Title: Employees of IGM clinic and workers stopped work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.