बावड्यात इच्छुकांचा गाठीभेटीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:05+5:302021-01-08T05:17:05+5:30
कसबा बावडा : महानगरपालिका निवडणूक काही महिन्यात होण्याची शक्यता असली, तरी बावड्यात आतापासूनच इच्छुकांनी गाठीभेटींवर भर दिला आहे. काहींनी ...

बावड्यात इच्छुकांचा गाठीभेटीवर भर
कसबा बावडा : महानगरपालिका निवडणूक काही महिन्यात होण्याची शक्यता असली, तरी बावड्यात आतापासूनच इच्छुकांनी गाठीभेटींवर भर दिला आहे. काहींनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदारांच्या व मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे.
कसबा बावड्यातील सहा प्रभागांपैकी चार प्रभाग हे सर्वसाधारण महिलांसाठी तर दोन प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुले झाले आहेत. महिलांसाठी आरक्षित झालेल्या प्रभागांच्या तुलनेत उमेदवार कमी असतील, असे चित्र सुरुवातीला होते. परंतु, आता सर्वसाधारण खुल्या झालेल्या गटात जशी उमेदवारांची गर्दी होत आहे, अगदी तशीच गर्दी महिलांसाठी आरक्षित झालेल्या प्रभागांमध्येही होत आहे.
दरम्यान, परिसरातील काही इच्छुक उमेदवारांनी आता मोक्याच्या ठिकाणी डिजिटल फलक झळकवले आहेत. तसेच प्रचारासाठी सोशल मीडियाचाही आधार घेतला जात आहे. मागील निवडणुकीतील मतदारांच्या यादीवरून गल्लीनुसार यादी करण्याचे कामही काहींनी सुरू केले आहे. सोशल मीडियावरून आपण आत्तापर्यंत केलेल्या सामाजिक कार्याची माहिती व्हायरल केली जात आहे.