इचलकरंजी, पेठवडगाव तालुक्यांसाठी जोर
By Admin | Updated: May 14, 2015 00:34 IST2015-05-13T21:48:43+5:302015-05-14T00:34:30+5:30
प्रशासकीय कामासाठी गैरसोय थांबवा : ब्रिटिश काळात राबविण्यात आलेला तालुका पॅटर्न हातकणंगले तालुक्यासाठी कालबाह्य

इचलकरंजी, पेठवडगाव तालुक्यांसाठी जोर
दिलीप चरणे - नवे पारगाव ब्रिटिश काळात राबविण्यात
आलेला तालुका पॅटर्न आता हातकणंगले तालुक्यासाठी कालबाह्य झाला आहे. प्रशासकीय कामासाठी जनतेची होणारी गैरसोय थांबविण्यासाठी हातकणंगलेचे विभाजन करून पेठवडगाव व इचलकरंजी हे दोन तालुके व्हावेत, अशी मागणी सन २००० पासून जोर धरत आहे. गेल्या १५ वर्षांत तालुक्याची वाढ व विस्तार झपाट्याने झाला. त्यामुळे हातकणंगलेचे विभाजन होऊन नियोजित पेठवडगाव तालुक्यासाठी परिसरातील गावांचा व नियोजित इचलकरंजी तालुक्यात इचलकरंजी सभोवतीच्या गावांचा समावेश होऊन विभाजन व्हावे.वारणेजवळील निलेवाडी ते हुपरीजवळची जंगमवाडी ही हातकणंगले तालुक्याची दूरची टोके आहेत. हातकणंगले तालुक्याची लोकसंख्या वाढली तसा प्रशासकीय कामांचा ताणही वाढत गेला आहे. वाढलेली गर्दी व उपलब्ध साधनसामग्री, मनुष्यबळ यांचा ताळमेळ लागत नसल्याने जनतेच्या कामाचा निपटारा वेळेत होत नाही.जनतेला प्रशासकीय कामांसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. परिणामी, लोकांचे आर्थिक नुकसान होऊन वेळही वाया जातो. कामे वेळेत करून घेण्यासाठी लोक शॉर्टकट शोधू लागले. त्यातून भ्रष्टाचार वाढू लागला. यामुळे जनता वैतागली असून, तालुका विभाजनाच्या मागणीला बळ मिळू लागले आहे.पेठवडगाव तालुका निर्मिती करताना जयसिंगपूर-शिरोली- कोल्हापूर या मुख्य रस्त्याच्या उत्तर बाजूकडील सर्व गावे, पन्हाळा तालुक्याची पूर्वीचीच हद्द, वारणा नदीपर्यंत उत्तरेची हद्द व करवीर तालुक्याची पूर्वीची हद्द असा असावा. नियोजित पेठवडगाव तालुक्यामध्ये निलेवाडी, जुने पारगाव, नवे पारगाव, तळसंदे, चावरे, किणी, घुणकी, वाठार, अंबप, अंबपवाडी, पाडळी, मनपाडळे, टोप, नागाव, शिरोली, नरंदे, उदगाव, खोची, भेंडवडे, लाटवडे, भादोले, पेठवडगाव, आदी गावांचा समावेश असावा. नियोजित इचलकरंजी तालुक्यामध्ये जयसिंगपूर-शिरोली- कोल्हापूर या मुख्य रस्त्याच्या दक्षिणेकडील सर्व गावे, करवीर तालुक्याची पूर्वीचीच हद्द, शिरोळ व कागल तालुक्याची पूर्वीचीच हद्द ठेवून तालुका व्हावा.
यामध्ये हालोंडी, चोकाक, माणगाव, रुकडी, कोरोची, साजणी, नीळवणी, शहापूर, रुई, कबनूर, इचलकरंजी, पट्टणकोडोली, इंगळी, चंदूर, हुपरी, रेंदाळ, तळंदगे, रांगोळी, तारदाळ, यळगूड, जंगमवाडी, आदी गावांचा समावेश असावा. (क्रमश:)
हातकणंगले तालुका विभाजन