पुतळा सुशोभीकरणाच्या कामास मिळणार गती

By Admin | Updated: December 19, 2014 00:12 IST2014-12-18T23:54:08+5:302014-12-19T00:12:54+5:30

महापालिका : वीज, पाणी जोडणीसाठी थांबले काम; राजर्षी शाहू, आईसाहेब महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण

The embellishments will get the embellishment of the statue | पुतळा सुशोभीकरणाच्या कामास मिळणार गती

पुतळा सुशोभीकरणाच्या कामास मिळणार गती

कोल्हापूर : दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज व अयोध्या चित्रमंदिराच्या दारात असलेल्या आईसाहेब महाराज पुतळ्याभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरणाचे काम संथ गतीने सुरू आहे. गेले काही दिवस बंद असलेले हे काम वीज व पाणी जोडणी झाल्याने आता दोन दिवसांत सुरू होणार असल्याची माहिती उपशहर अभियंता हर्षजित घाटगे यांनी ‘लोकमत’ला दिली.
दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळ्याभोवती संरक्षक कठड्यासह सुशोभीकरणाच्या कामास आठ महिन्यांपूर्वी महापालिकेने सुरुवात केली. पुतळ्याभोवतीची तटबंदी काढून पूर्वीप्रमाणेच पुतळ्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊनच शोभेल अशा प्रकारचे सुशोभीकरणाचे काम करण्यात आल्याचा दावा महापालिकेने केला आहे. त्यानुसार पुतळ्याभोवती असणाऱ्या पूर्वीच्या रिलिंगप्रमाणेच नव्याने रिलिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, पुतळ्याभोवती लहान कारंजे, रिकाम्या जागेत दगडी पेव्हिंग बसविणे, छोटा बगीचा, वीज व्यवस्था, आदी कामे अपूर्ण आहेत.
आईसाहेब महाराज यांच्या पुतळ्याभोवती असणारे संरक्षण कुंपन खराब होऊन पुतळ्यासमोरील मोठा कारंजाही गेली कित्येक वर्षे बंद स्थितीत होता. वाहनांच्या धुरामुळे संगमरवरी पुतळाही काळवंडला आहे. आईसाहेब महाराजांच्या पुतळ्याची दुरवस्था थांबविण्याची मागणी नागरिकांतून होती. त्याची दखल घेत महापालिकेने पुतळ्याभोवती सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात केली; मात्र गेली वर्षभर सुरू असलेले काम अद्याप अपूर्णच आहे. नवीन आराखड्यानुसार पुतळ्याच्या मागून असलेल्या प्रवेशात बदल करून पूर्वेकडून प्रवेशद्वार व मागील बाजूस बगीचा, शिवाजी टेक्निकल व ट्रेझरीच्या बाजूला दीर्घकाळ टिकणारे छोटे कारंजे उभारून विद्युत रोषणाईचे काम अद्याप अपूर्णच आहे. दोन्ही पुतळ्यांचे सुशोभीकरण त्वरित पूर्ण करण्याची मागणी होत आहे. (प्रतिनिधी)


रस्त्याची उंची वाढल्याने पुतळ्याभोवतीची जागा खाली सखलात गेली आहे. हे टाळण्यासाठी पुतळ्याभोवती पूर्वीप्रमाणेच पिलर व ग्रिलिंग करण्याचे काम पूर्ण झाले आहे. पाणी व वीज जोडणीमुळे पुढच्या टप्प्यातील कामे थांबली होती. येत्या दोन दिवसांत पुन्हा कामास सुरुवात होईल.
- हर्षजित घाटगे (उपशहर अभियंता)

Web Title: The embellishments will get the embellishment of the statue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.