कासारवाडी वनक्षेत्राला तटबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST2021-09-19T04:24:57+5:302021-09-19T04:24:57+5:30
कासारवाडी वनक्षेत्राच्या हद्दीतील रस्ते गुरुवारी वनविभागाकडून तटबंदी घालून बंद करण्यात आले. तटबंदीतून आत प्रवेश करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात ...

कासारवाडी वनक्षेत्राला तटबंदी
कासारवाडी वनक्षेत्राच्या हद्दीतील रस्ते गुरुवारी वनविभागाकडून तटबंदी घालून बंद करण्यात आले. तटबंदीतून आत प्रवेश करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा करवीर वनपाल आर. एस. कांबळे यांनी दिला आहे.
कासारवाडी येथील गायरान जमीन दोन महिन्यांपूर्वी वन विभागाकडे हस्तांतरित झाली असून, या जागेत मोठ्या प्रमाणात चोरून दगड उत्खनन सुरू होते. वनविभागाच्या हे लक्षात आल्यानंतर वनविभागाच्या हद्दीतील प्रमुख रस्ते, चोरट्या वाटा वनविभागाने दगडी बांधकाम व सिमेंट काँक्रिटने बंद केल्या.
गायरान गट नं. ६३०/१/अ हे २० नोव्हेंबर १९५३ रोजी "संरक्षित वन" म्हणून अधिसूचित केले होते. दोन महिन्यांपूर्वी वन विभागाने अतिक्रमण काढून याचा ताबा घेतला होता. यापुढे वनक्षेत्रात अवैध उत्खनन तसेच इतर गैरप्रकार होऊ नयेत म्हणून गुरुवारी करवीरचे वनक्षेत्रपाल आर. एस. कांबळे यांनी प्रमुख रस्ते व काही चोरट्या वाटा बंद केल्या. यानंतर मोजक्या ठिकाणी चर खोदून वनविभागाच्या हद्दीत कायमस्वरूपी पूर्णपणे प्रवेश बंदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी वनपाल साताप्पा जाधव, वनपाल विजय पाटील, वनपाल बळवंत शिंदे, वनपाल आर. के. देसाई उपस्थित होते.
कोट : वरिष्ठांच्या सूचनेनुसार वनक्षेत्रात दगड उत्खनन होऊ नये म्हणून संरक्षक व प्रतिबंधक प्राथमिक स्तरावर रस्ते बंद केले आहेत. याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येईल. आर. एस. कांबळे, करवीर क्षेत्रपाल फोटो: १८ कासारवाडी वनतटबंदी
कासारवाडी वनक्षेत्र हद्दीतील रस्ते बंद करताना वन अधिकारी व कर्मचारी.