लसीकरणातील कोल्हापूरवरचा अन्याय दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:20 IST2021-07-17T04:20:06+5:302021-07-17T04:20:06+5:30
कोल्हापूर : दुसऱ्या लाटेतील कोरोना संक्रमण रोखण्यात जिल्हा व महापालिका प्रशासन पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. गेले दोन महिने ...

लसीकरणातील कोल्हापूरवरचा अन्याय दूर करा
कोल्हापूर : दुसऱ्या लाटेतील कोरोना संक्रमण रोखण्यात जिल्हा व महापालिका प्रशासन पूर्णपणे अयशस्वी ठरले आहेत. गेले दोन महिने रोज सरासरी दीड हजार रुग्ण सापडत आहेत. लसीकरणाच्या बाबतीत कोल्हापूरला सापत्नभावाची वागणूक मिळत आहे. संक्रमण आणि लसीकरणाबाबत राज्य सरकार कोल्हापूरवर अन्याय करीत असून, तो तातडीने दूर करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे शुक्रवारी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आरोग्यमंत्र्यांची भाजपच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी महेश जाधव म्हणाले, एप्रिलमध्ये रुग्ण कमी असताना गोकुळच्या निवडणुकीत प्रचाराला वाव मिळावा म्हणून निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली गेली नाही. त्यामुळेच रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली, हे सुरू असताना राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला जाब विचारला नाही.
राहुल चिकोडे म्हणाले, गेल्या महिन्यात आपण कोरोनाचा आढावा घेताना प्रशासनाला अनेक सूचना दिल्या होत्या, तरीही परिस्थिती बदललेली नाही. अजित ठाणेकर म्हणाले, कोल्हापूरवर लसीकरणाबाबतही राज्य सरकारने अन्याय केलेला आहे. अनेक ठिकाणी लसीकरण ५० टक्क्यांपर्यंत पोहोचत असताना कोल्हापुरात ते दहा टक्क्यांच्या आसपास रेंगाळले आहे, तरी हा अन्याय दूर करावा, अशी मागणी केली.
मंत्री टोपे यांनी लसीकरणाबाबत कोल्हापूरला झुकते माप देऊ, असे आश्वासन देत खासगी हॉस्पिटलकडून आकारल्या जाणाऱ्या बिलाचे ऑडिट अधिक सक्षमपणे करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दिल्या. यावेळी अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे, चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, संजय सावंत, संतोष भिवटे, रवींद्र मुतगी, आजम जमादार, आदी उपस्थित होते.
--
फोटो नं १६०७२०२१-कोल-बीजेपी निवेदन
ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी भारतीय जनता पक्षाच्यावतीने आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी महेश जाधव, राहुल चिकोडे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
----