आबांच्या कुटुंबियांना संपविण्याचा डाव
By Admin | Updated: August 2, 2015 00:12 IST2015-08-02T00:10:39+5:302015-08-02T00:12:18+5:30
सुमनताई पाटील : निवडणुकीतील प्रकार पूर्वनियोजित

आबांच्या कुटुंबियांना संपविण्याचा डाव
तासगाव : बाजार समिती निवडणुकीत घडलेला प्रकार हा पूर्वनियोजित होता. खासदार संजय पाटील यांनी आणलेल्या गुंडांनी आमच्यावर जीवघेणा हल्ला केला. आबांची कन्या, मुलगा या सर्व जणांना टार्गेट करण्यात आले. हा आबांच्या कुटुंबियांना संपविण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप आमदार सुमनताई पाटील यांनी केला. सूतगिरणीवर आयोजित पत्रकार बैठकीत त्या बोलत होत्या.
आमदार पाटील म्हणाल्या, आर. आर. आबांच्यानंतर आमचा गट संपवण्याचे सर्व प्रयत्न भाजपच्या खासदारांनी केले. मात्र मार्केट कमिटीतील राष्ट्रवादीकडे झुकलेला कल पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळेच माझ्यावर आणि आमच्या कार्यकर्त्यांवर जीवघेणा हल्ला करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या हल्यात आमचे ज्येष्ठ नेते दिनकरदादा पाटील, पंचायत समितीच्या सभापती हर्षला पाटील यांचे पती संयज पाटील, निवास पाटील, बोरगाव, डी. बी. पाटील, येळावी, संताजी पाटील, अविनाश पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. ते यात गंभीर जखमी झाले. युवक राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष ताजुद्दीन तांबोळी यांच्या गाडीचा तोडफोड करण्यात आली. या सर्व प्रकारामुळे राजकारणाची हीन पातळी गाठली आहे. आबांच्या निधनामुळे खासदारांनी मला पोरके समजू नये. आबांनी आयुष्यभर केलेल्या जनसेवेमुळे तालुका आणि राज्य माझ्या पाठीशी उभा आहे. हा विषय वरिष्ठ पातळीवर कळवण्यात आला आहे. पोलिसांनी यावेळी बघ्याची भूमिका घेतली. आता तरी पोलिसांनी खासदार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करावी., अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल. (वार्ताहर)