गावोगावी पेटला ‘जय मल्हार’चा एल्गार
By Admin | Updated: July 28, 2014 23:21 IST2014-07-28T22:28:25+5:302014-07-28T23:21:01+5:30
धनगर समाज संतप्त : जिल्ह्यात विविध ठिकाणी शेळ्या-मेंढ्यांना घेऊन रास्ता रोको, मोर्चा अन् निषेध फेरी

गावोगावी पेटला ‘जय मल्हार’चा एल्गार
सातारा : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील धनगर समाज आक्रमक बनत रस्त्यावर उतरला. सातारा, फलटण, कोरेगाव, जावळी, महाबळेश्वर, माण तालुक्यात मोर्चा, रास्ता रोको, निषेध फेरी या माध्यमातून समाजबांधवांनी निषेध व्यक्त केला.
फलटण : धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी आक्रमक होत सोमवारी फलटण तालुक्यातील धनगर समाजाच्या वतीने फलटण-पंढरपूर रस्त्यावर विडणी येथे रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनात धनगर बांधव शेळ्या-मेंढ्यासह पारंपरिक वेशभूषा करून सहभागी झाले होते.
विडणी, ता. फलटण येथे सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषद सदस्य महादेवराव पोकळे यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाच्या वतीने सर्वपक्षीय आंदोलन करून एक तास रस्ता रोखून धरण्यात आला. या आंदोलनात लहान मुले, महिला, वृद्धही सहभागी झाले होते.
स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे, श्रीराम कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, रासपचे बजरंग गावडे आदींनी पाठिंबा दिला. दादासाहेब चोरमले, संतोष ठोंबरे, डॉ. उत्तमराव शेंडे, चंद्रकांत नाळे, तुकाराम शिंदे, शरद नाळे, पै. बापू लोखंडे, नाथा बुरुंगले, पोपटराव खरे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
नंदीवाले समाजही आरक्षणासाठी रस्त्यावर
खंडाळा : नंदीवाले समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश व्हावा, या मागणीसाठी अखिल महाराष्ट्र राज्य नंदीवाले समाज संघटनेच्या वतीने सोमवारी मोर्चा काढण्यात आला. संघटनेचे राज्य अध्यक्ष हणमंतराव पवार, तालुकाध्यक्ष शालन जाधव यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
महाबळेश्वरमध्ये भरपावसात मोर्चा
धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी महाबळेश्वर शहरात भरपावसात तालुक्यातील धनगर समाजाने मोर्चा काढला. जोरदार घोषणाबाजी करत शहरातून मोर्चा काढण्यात आला. तहसील कार्यालयावर मोर्चाने जाऊन मागण्यांचे निवेदन देण्यात आले. डोंगरी भागात भटकंतीचे आयुष्य जगणाऱ्या या समाजाला त्याचा घटनात्मक अधिकार मिळावा, अन्यथा सरकारच्या विरोधात मतदान करण्याचा इशारा प्रशांत आखाडे यांनी दिला. माजी नगराध्यक्ष बबनराव ढेबे यांनी राजीनामा देण्याचा इशारा दिला. तर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे आपले राजीनामे दिल्याचे जाहीर केले. मोर्चात उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, युवा नेते संदीप आखाडे यांच्यासह समाजबांधव सहभागी झाले होते. यावेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख यशवंत घाडगे, विजय नायडू यांनी मार्चास पाठिंबा दिला.
लोणंदमध्ये कडकडीत बंद
लोणंद : आरक्षणाच्या मुद्यावर आक्रमक होत धनगर समाजाने दिलेल्या बंदच्या हाकेला लोणंदवासीयांनी शंभर टक्के प्रतिसाद दिला. यावेळी मधुकर पिचड यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
लोणंद ग्रामपंचायतीपासून घोषणबाजी करत मोर्चा काढण्यात आला. मोर्चात शेळ्या-मेंढ्यांसह शेकडो समाजबांधवांसह सहभागी झाले होते. त्यामुळे नीरा-सातारा, शिरवळ-फलटण महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. तसेच निषेध फेरीही काढण्यात आली. ग्रामपंचायतीच्या पटांगणावर झालेल्या सभेत आमदार मकरंद पाटील, समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, अॅड. बाळासाहेब बागवान, रमेश धायगुडे, नितीन भरगुडे-पाटील, म्हस्कूअण्णा शेळके, अॅड. सचिन धायगुडे, बाळासाहेब शेळके, अजय धायगुडे, भाऊसाहेब शेळके, दत्ता बिचुकले, संदीप शेळके, बबनराव ठोंबरे, प्रा. चोपडे, गोरख धायगुडे यांनी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)
पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
समाज कल्याण सभापती आनंदराव शेळके-पाटील, रमेश धायगुडे, अंदोरी सरपंच म्हस्कू बोडके, उपसरपंच अशोक धायगुडे, दक्षता समितीचे बाळासाहेब शेळके, हर्षवर्धन शेळके, सागर शेळके यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले.
बहिणीपाठोपाठ भावाचाही राजीनामा
धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत कालच खंडाळा तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्या वंदना धायगुडे-पाटील यांनी पक्षाकडे आपला राजीनामा पाठविला होता. आज (सोमवार) त्यांचे भाऊ महादेवराव पोकळे यांनीही आरक्षणाबाबत शासन चालढकल करत असल्याने पक्षाकडे आपला राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. पुढील काळात आरक्षणाच्या मुद्यावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पोकळे यांनी दिला.