शिरोळमध्ये पूरग्रस्तांचा एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:30 IST2021-08-18T04:30:33+5:302021-08-18T04:30:33+5:30
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली. ४३ गावांतील पूरग्रस्तांनी तहसील कार्यालयावर ...

शिरोळमध्ये पूरग्रस्तांचा एल्गार
शिरोळ : शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांच्या प्रश्नांसाठी पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने मंगळवारी आक्रमक भूमिका घेतली. ४३ गावांतील पूरग्रस्तांनी तहसील कार्यालयावर पावसात भव्य मोर्चा काढून संताप व्यक्त केला. पूरग्रस्तांना अद्याप मदत मिळाली नसल्याने राज्य शासनाचा निषेध यावेळी करण्यात आला. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा हा लढा सुरू राहणार असल्याचा इशाराही यावेळी आंदोलकांनी दिला.
महापुराबाबत शासनाकडून कोणतेच नियोजन झाले नसल्याने तसेच पूरग्रस्तांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नसल्याच्या निषेधार्थ पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने मंगळवारी मोर्चाचे आयोजन केले होते. या पार्श्वभूमीवर शिवाजी तख्त येथून मोर्चाला सुरुवात झाली. तहसील कार्यालयासमोर आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, अण्णासाहेब चौगुले, सुनील इनामदार, सुरेश सासणे, अॅड. सुशांत पाटील, दशरथ काळे, डॉ. संजय पाटील, रामचंद्र डांगे आदींनी मनोगत व्यक्त करून तीव्र भावना व्यक्त केल्या. मागण्यांचे निवेदन तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे यांना देण्यात आले. निवेदन स्वीकारुन तहसीलदार डॉ. मोरे म्हणाल्या, पहिल्या टप्प्यात २७ गावांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. या गावचे सानुग्रह अनुदान वाटपाचे काम सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. उर्वरित गावांच्या पंचनाम्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यांचेही अनुदान लवकरच दिले जाईल.
मोर्चात विश्वास बालीघाटे, डॉ. संजय पाटील, सुनील इनामदार, अॅड. सुशांत पाटील, दगडू माने यांच्यासह मोठ्या संख्येने पूरग्रस्त सहभागी झाले होते.
-
चौकट - पूरग्रस्तांच्या मागण्या
शिरोळ तालुक्यात महापूर येऊ नये यासाठी गावनिहाय कृती आराखडा तयार करावा, पूर व महापूर नियंत्रण रेषा आखावी, कृष्णा, पंचगंगा, वारणा व दुधगंगा या नदीवरील धरणातील पाणीसाठा व विसर्गाबाबत नियोजन करावे, कर्नाटक व महाराष्ट्र या दोन्ही राज्यांतील समन्वयासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेऊन अधिकारी व स्थानिक समितीची नियुक्ती करावी, शेतीपंप व साहित्यांची शंभर टक्के नुकसानभरपाई द्यावी, यासह तीस मागण्या यावेळी करण्यात आल्या.
फोटो - १७०८२०२१-जेएवाय-०२,०३
फोटो ओळ - शिरोळ येथे पूरग्रस्त अन्याय निवारण समितीच्यावतीने तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला.