अकरावीसाठी अर्जांसह ‘मेरिट’ वाढले
By Admin | Updated: July 1, 2015 00:57 IST2015-07-01T00:55:07+5:302015-07-01T00:57:16+5:30
प्रवेश प्रक्रियेची निवड यादी जाहीर : आजपासून प्रत्यक्ष प्रवेशाला प्रारंभ

अकरावीसाठी अर्जांसह ‘मेरिट’ वाढले
कोल्हापूर : अकरावीच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेची अंतिम निवड यादी समितीने मंगळवारी जाहीर केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवेश अर्जांसह विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे मेरिट (गुणवत्ता) अर्धा ते एक टक्क्याने वाढले आहे. समितीकडे अर्ज दाखल केलेल्या विद्यार्थ्यांपैकी ७० टक्के विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार प्रवेश दिला आहे. आज, बुधवारपासून प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित ठेवला जाणार नाही, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक एम. के. गोंधळी आणि प्रवेश प्रक्रिया समितीचे कार्याध्यक्ष
डॉ. जे. बी. पिष्टे यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.
शिक्षण उपसंचालक गोंधळी म्हणाले, शहरातील ३२ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावीसाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया १६ जूनपासून सुरू झाली. विज्ञान शाखेसाठी ७ हजार ५४, वाणिज्य शाखा (मराठी) ३ हजार ३१, (इंग्रजी) १ हजार ३९४, कला शाखा (मराठी) २ हजार १७५, (इंग्रजी) ३० अशा विद्यार्थी-विद्यार्थिनींचा समावेश आहे. यात प्रवेश क्षमतेपेक्षा विज्ञान शाखेसाठी १ हजार ६१४ आणि वाणिज्य शाखेसाठी ३०५ अर्ज जादा आले आहेत. निवड यादी पाहिली असता गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखेचे मेरिट अर्धा ते एक टक्क्यांनी वाढले आहे.
डॉ. पिष्टे म्हणाले, शासकीय तंत्रनिकेतन, अभियांत्रिकी, आयटीआयमुळे विज्ञान शाखेकडील वाढलेले अर्ज कमी होतील. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांनी बुधवारपासून ४ जुलैपर्यंत प्रवेश घ्यावयाचा आहे. शहरातील सर्व कनिष्ठ महाविद्यालये ७ जुलैपासून सुरू होणार आहेत.
न्यू कॉलेज ‘टॉप’...
प्रवेश प्रक्रिया समितीने जाहीर केलेल्या या वर्षीच्या निवड यादीत महाविद्यालयानिहाय प्रवेशासाठीच्या टक्केवारीचा कट-आॅफ दिला आहे. यात यंदा विवेकानंद कॉलेजला मागे टाकून विज्ञान, वाणिज्य आणि कला शाखांत न्यू कॉलेजने बाजी मारली आहे. या कॉलेजचा विज्ञान शाखेचा कट-आॅफ ९१.२० टक्के, वाणिज्यचा ८१.४० आणि कला शाखेचा ७२.८० टक्के आहे.
‘एटीकेटीं’ना सोमवारी प्रवेश : निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशानंतर रिक्त राहिलेल्या जागांवर दहावीतील ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांना सोमवारी (दि. ६) प्रवेश दिला जाईल.