‘भाजप-ताराराणी’च्या यादीत अकरा आजी-माजी नगरसेवक
By Admin | Updated: September 27, 2015 00:30 IST2015-09-27T00:30:19+5:302015-09-27T00:30:51+5:30
महापालिका निवडणूक : पहिली २१ उमेदवारांची यादी ; विक्रम जरग, परमार, प्रकाश मोहितेंना संधी

‘भाजप-ताराराणी’च्या यादीत अकरा आजी-माजी नगरसेवक
कोल्हापूर : भाजप, ताराराणी आघाडी, स्वाभिमानी संघटनेच्यावतीने महापालिकेच्या निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील २१ उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर करण्यात आली. त्यामध्ये आजी-माजी अकरा नगरसेवकांना स्थान मिळाले आहे. जाहीर झालेले उमेदवारही अपेक्षेप्रमाणेच आहेत. पहिल्या यादीत रिपब्लिकन पक्षाला मात्र स्थान मिळालेले नाही.
भाजपकडून अजित ठाणेकर, शीतल रामुगडे, मामा कोळवणर, श्रुती पाटील यांना संधी मिळाली आहे. ताराराणी आघाडीकडून सत्यजित कदम, किरण शिराळे, ईश्वर परमार, तेजस्विनी रविकिरण इंगवले, विक्रम जरग, आदींना रिंगणात उतरविले आहे. एकवीसपैकी प्रत्येकी दहा जागा भाजप व ताराराणी आघाडी लढविणार आहे. एक जागा स्वाभिमानी संघटनेला दिली आहे. भाजपने पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच प्रामुख्याने संधी दिली आहे. भाजपचे कोल्हापूर महानगराध्यक्ष महेश जाधव, ताराराणी आघाडीचे अध्यक्ष स्वरूप महाडिक व ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष भगवान काटे यांनी ही यादी प्रसिद्धिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसने ४१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून बाजी मारली. त्यापाठोपाठ आता भाजपने यादी जाहीर केली आहे. त्यामुळे काँग्रेस व शिवसेना कुणाला संधी देते याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
भाजकडून निष्ठावंतांना संधी
भाजपने पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व विद्यमान नगरसेवक आर. डी. पाटील यांची कन्या श्रुती पाटील व नगरसेवक सुभाष रामुगडे यांच्या पत्नी शीतल यांना रिंगणात उतरविले आहे. पक्षाच्या युवा मोर्चाचा शहराध्यक्ष संदीप देसाई यांची पत्नी पवित्रा या शिपुगडे तालीम प्रभागातून लढणार आहेत.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निवासस्थान असलेल्या तपोवन प्रभागातून विजय खाडे या कार्यकर्त्यास पक्षाने मैदानात उतरविले आहे. नागाळा पार्क प्रभागातून लढणारे अशोक कोळवणकर हे त्या परिसरात ‘मामा कोळवणकर’ या नावाने प्रसिद्ध आहेत. दहापैकी आठ उमेदवार पक्षाशी निगडित आहेत. रुईकर कॉलनी प्रभागातून उमेदवारी दिलेल्या उमा उदय इंगळे या मात्र नवख्या उमेदवार आहेत. त्यांचे पती यूथ बँकेत नोकरीस आहेत. संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून निवडणूक लढविणाऱ्या यशोदा मोहिते या आमदार महाडिक यांचे कार्यकर्ते प्रकाश मोहिते यांच्या पत्नी आहेत.
ठाणेकर पुन्हा रिंगणात
अजित ठाणेकर यांना गत निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही म्हणून पक्ष सोडावा लागला होता. ते महालक्ष्मी मंदिर प्रभागातून इच्छुक होते. तिथे पक्षाने निवडून येण्याच्या क्षमतेवर माजी महापौर नंदकुमार वळंजू यांना उमेदवारी दिली. त्या रागातून त्यांनी पक्षाविरुद्ध बंड केले. त्यांच्यावर पक्षाने कारवाईही केली होती; परंतु या निवडणुकीत मात्र त्यांची वर्णी पहिल्याच यादीत लागली आहे. तटाकडील तालीम प्रभागातून ते लढतील. जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांचे निवासस्थान असलेला हा प्रभाग आहे.
दोन प्रभाग, दोन पक्ष
प्रकाश मोहिते ‘ताराराणी’कडून नाथागोळे प्रभागातून निवडणूक लढविणार आहेत. त्यांच्या पत्नीला भाजपने संभाजीनगर बसस्थानक प्रभागातून उमेदवारी दिली आहे. आगामी महापौरपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित आहे. ते भाजपच्या वाट्याला जाणार आहे. यशोदा मोहिते या त्या प्रवर्गातील असल्याने तो हिशेब करून मोहिते यांनी ही राजकीय खेळी केली आहे.
भाजप-ताराराणी महायुतीची यादी
प्र. क्र. प्रभागाचे नाव आरक्षण उमेदवाराचे नाव
१२ नागाळा पार्क खुला अशोक कोळवणकर
२३ रुईकर कॉलनी खुला महिला उमा उदय इंगळे
२९ शिपुगडे तालीम खुला महिला पवित्रा संदीप देसाई
३३ महालक्ष्मी मंदिर ओबीसी महिला श्रुती राम पाटील
३९ राजारामपुरी एक्स्टेंशन खुला विजय महादेव जाधव
४८ तटाकडील तालीम खुला अजित दत्तात्रय ठाणेकर
५६ संभाजीनगर बसस्थानक खुला यशोदा प्रकाश मोहिते
६८ कळंबा फिल्टर हाऊस अनुसूचित जाती महिला शीतल सुभाष रामुगडे
६९ तपोवन ओबीसी खुला विजयसिंह पांडुरंग खाडे
७१ रंकाळा तलाव खुला अमोल सुरेश पालोजी
ताराराणी आघाडीचे उमेदवार
प्र. क्र. प्रभागाचे नाव आरक्षण उमेदवाराचे नाव
०८ भोसलेवाडी-कदमवाडी खुला सत्यजित शिवाजीराव कदम
१० शाहू कॉलेज खुला महिला शुभांगी रमेश भोसले
२७ ट्रेझरी आॅफिस खुला महिला मेहजबीन रियाज सुभेदार
३० खोल खंडोबा ओबीसी खुला किरण अण्णासाहेब शिराळे
३२ बिंदू चौक खुला ईश्वर शांतीलाल परमार
४० दौलतनगर खुला विलास भैरू वास्कर
४७ फिरंगाई तालीम खुला महिला तेजस्विनी रविकिरण इंगवले
५५ पद्माराजे उद्यान खुला विक्रम बापूसाहेब जरग
५७ नाथागोळे तालीम खुला प्रकाश महादेव मोहिते
६४ शिवाजी विद्यापीठ- खुला प्रकाश ज्ञानोबा काटे
कृषी महाविद्यालय
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार
प्र. क्र. प्रभागाचे नाव आरक्षण उमेदवाराचे नाव
७ सर्किट हाऊस ओबीसी महिला अर्चना उमेश पागर