पहिल्यादिवशी ५९५ विद्यार्थ्यांचा ‘अकरावी’ प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:29 IST2021-09-09T04:29:12+5:302021-09-09T04:29:12+5:30
शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठीची निवड यादी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने मंगळवारी जाहीर केली. त्यामध्ये नावे असलेल्या ...

पहिल्यादिवशी ५९५ विद्यार्थ्यांचा ‘अकरावी’ प्रवेश
शहरातील विविध ३५ कनिष्ठ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठीची निवड यादी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीने मंगळवारी जाहीर केली. त्यामध्ये नावे असलेल्या विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करण्यास बुधवारपासून प्रारंभ केला. सकाळी साडेदहा वाजल्यापासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी येऊ लागले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक दक्षता घेऊन न्यू कॉलेज, डीआरके कॉमर्स कॉलेज, महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, एस. एम. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, गोखले कॉलेज, विवेकानंद कॉलेज, महावीर कॉलेज, राजाराम कॉलेज, कमला कॉलेज, आदी महाविद्यालयांकडून प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने स्वतंत्र समिती स्थापन केली आहे. डीआरके कॉमर्स कॉलेज आणि न्यू कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करून घेण्यात आली. प्रवेशासाठी आलेल्या विद्यार्थ्यांची गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, आदी कागदपत्रांची पाहणी करून आणि शुल्क भरून घेऊन त्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले. काही महाविद्यालयांमध्ये सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रक्रिया सुरू होती. पहिल्यादिवशी विज्ञान विद्याशाखेतील ३७४, कला मराठी माध्यमातील ८६, वाणिज्य इंग्रजी माध्यमासाठी ६७, तर वाणिज्य मराठीसाठी ६५ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले. कला इंग्रजी माध्यमाच्या अवघ्या तीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. दिवसभरात केंद्रीय समितीकडे वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेतील एकूण १६ तक्रार दाखल झाल्या. त्यातील वाणिज्य शाखेतील अवघी एक तक्रार समितीने मान्य केली.
शाखानिहाय प्रवेश निश्चिती
विज्ञान : ३७४
कला (मराठी) : ८६
वाणिज्य (इंग्रजी) : ६७
वाणिज्य (मराठी) : ६५
कला (इंग्रजी) : ३
विद्यार्थ्यांचा फेरफटका
प्रवेश निश्चितीसाठी अधिकतर विद्यार्थी आपल्या पालकांसमवेत, तर काहीजण मित्र-मैत्रिणींसमवेत आले होते. प्रवेश निश्चितीची प्रक्रिया झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात फेरफटका मारला. तेथील सुविधांची माहिती घेतली.