अकरा गावांचा उद्यापासून पाणीपुरवठा बंद
By Admin | Updated: September 3, 2015 00:19 IST2015-09-03T00:19:47+5:302015-09-03T00:19:47+5:30
थकबाकीपोटी जीवन प्राधीकरणाची कारवाई : गांधीनगर, कणेरी, उजळाईवाडी, उचगाव आदींचा समावेश

अकरा गावांचा उद्यापासून पाणीपुरवठा बंद
कोल्हापूर : गांधीनगर, उचगाव, गडमुडशिंगीसह अकरा गावांनी पाणीपट्टीच थकवल्याने या गावांचा शुक्रवार (दि. ४) पासून पाणीपुरवठा बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाने घेतला आहे. या गावांकडे तब्बल २ कोटी ५२ लाखांची थकबाकी असून, एकट्या उचगाव ग्रामपंचायतीकडे १ कोटी २५ लाख रूपये अडकल्याने प्राधीकरणच अडचणीत आले आहे.
करवीर तालुक्याच्या पूर्वेकडील गांधीनगर, गडमुडशिंगी, वळीवडे, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव, कणेरी, मोरेवाडी, उचगाव या गावांच्या पिण्याच्या पाण्यासाठी गांधीनगर प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजना मे २००३ ला सुरू केली. महाराष्ट्र जीवन प्राधीकरणाच्या माध्यमातून ही योजना कार्यरत आहे. पूर्वी या योजनेत हलसवडे, सांगवडे, सांगवडेवाडी, चिंचवाड, वसगडे या गावांचा समावेश होता, पण नंतर या गावांना वगळण्यात आले. या पाणी योजनेची बिले ग्रामपंचायतींना महिन्याला द्यावी लागतात. पण ही योजना सुरू झाल्यापासूनच थकबाकीचे गळते या योजनेला लागले आहे. हे गळते निघत नसल्याने संपूर्ण योजनाच अडचणीत आली आहे.
आतापर्यंत या अकरा गावांकडे अडीच कोटीच थकबाकी आहे. त्यातील उचगाव ग्रामपंचायतीकडे
१ कोटी २५ लाख रूपये थकीत असल्याने प्राधीकरण मेटाकुटीला आलेले आहे. प्राधीकरणाला योजनेचे वीज बिल महिन्याला १८ ते २० लाख रूपये येते, पण पाणीपट्टीची वसुलीच नसल्याने पैसे भरायचे कसे? असा पेच प्राधीकरणासमोर आहे. यापूर्वी दोन वेळा प्राधीकरणाने पाणीपुरवठा बंद केला होता. पैसे भरण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
गांधीनगर ग्रामपंचायतीचा चेक बाऊन्स
गांधीनगर ग्रामपंचायतीने थकबाकीपोटी जीवन प्राधीकरणाला पुढील तारखेचा धनादेश दिला होता. पण हा धनादेश वटला नाही, त्यामुळे ग्रामपंचायतीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
मग ग्रामस्थांचा काय दोष
अकरा गावांतील बहुतांशी ग्रामस्थ आपले पाण्याचे बिल वेळेत अदा करतात, पण तो पैसा ग्रामपंचायत इतरत्र खर्च करते. थकाबाकीपोटी प्राधीकरण पाणी बंद करणार, मग यात ‘त्या’ ग्रामस्थांचा काय दोष? असा सवाल उपस्थित केला जात आहे.