हत्तीची आजऱ्यात रपेट
By Admin | Updated: August 25, 2014 22:10 IST2014-08-25T21:40:41+5:302014-08-25T22:10:47+5:30
शहरवासीयांत घबराट : विद्यानगर, सर्वोदय कॉलनीतून हाजगोळीकडे प्रस्थान

हत्तीची आजऱ्यात रपेट
आजरा : आजरा शहरातील विद्यानगर कॉलनी, सर्वोदय कॉलनी येथून हत्तीने आज, सोमवारी पहाटे रपेट करीत व्हिक्टोरिया पुलाखालून सुलगावमार्गे खेडे-हाजगोळी परिसर गाठल्याने आजरा शहरवासीय चक्क हत्तीच्या या शहरातील वावराने हादरून गेले आहेत.
आज पहाटे हत्ती कर्पेवाडी-आवंडी वसाहतमार्गे साळगाव रस्त्यावरील तुकाई देवीच्या मंदिर परिसरात आला. मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून मंदिंराच्या पायऱ्या उतरून विद्यानगर सर्वोदय कॉलनीमार्गे जॅकवेलजवळील हिरण्यकेशी बंधाऱ्याशेजारून हिरण्यकेशी नदीपात्रातून सुलगावमार्गे खेडे येथील डोंगर परिसरात गेला आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागात डोंगरझाडीत वावर असणाऱ्या हत्तीने पूर्वेकडच्या हाजगोळी-खेडे भागात प्रवेश केला आहे.
या भागामध्ये ऊस व भातशेती वगळता कोणतीही शेती नसल्याने हत्तीचा शेतकऱ्यांना उपद्रव होण्याची शक्यता वाढली आहे. दरम्यान, वनविभागाने हत्तींचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांतून, तसेच शेतकऱ्यांतून होत आहे. (प्रतिनिधी)