हत्ती मस्त.. प्रशासन अन् राजकारणी मात्र सुस्त..!
By Admin | Updated: September 10, 2014 00:27 IST2014-09-10T00:02:28+5:302014-09-10T00:27:55+5:30
आजरा तालुक्यातील चित्र : हत्तींच्या उपद्रवाच्या दिवसागणिक अनेक घटना

हत्ती मस्त.. प्रशासन अन् राजकारणी मात्र सुस्त..!
कृष्णा सावंत - पेरणोली -गेले महिनाभर आजऱ्याच्या पश्चिम भागात हत्तींचा जोरदार धुमाकूळ सुरू आहे. हत्तीच्या धुमाकुळीकडे प्रशासन, राजकारण्यांसह कुणालाच लक्ष द्यावेसे वाटत नाही. त्यामुळे ‘हत्ती मस्त... प्रशासन आणि राजकारणी झाले सुस्त...’ अशी आजरा तालुक्याची अवस्था झाली आहे.
हत्तींचा उपद्रव आजऱ्यासह चंदगड व भुदरगड तालुक्यांत अनेक वर्षांपासून सुरू आहे. हत्तींना माघारी पाठविण्याच्या वनविभागाच्या मोहिमेशिवाय कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे पुन:पुन्हा आजरा व चंदगड तालुक्यांत हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे. जिल्ह्यातील सत्ताधारी मंडळींनी याकडे एकदाही गांभीर्याने पाहिलेले नाही.
यापूर्वी हत्तीने हल्ला केलेल्या अनेक घटना आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांत घडलेल्या आहेत. भादवणमधील विजय गोरे यांना हत्तीने गंभीर जखमी केल्यानंतर आजरा तालुक्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. हाळोली, मसोली, पेरणोलीहून भुदरगडकडे जाणारा हत्ती आता भादवण व हाजगोळी परिसरातही वावरू लागला आहे. भादवणमधील घटनेनंतर सोहाळेवरून पेरणोली परिसरात हत्ती आला. तो पेरणोलीमधील दलित वस्तीशेजारी रात्रीच अमित सावंत यांना दिसला. प्रसंगावधान राखून सावंत यांनी तेथून पळ काढला.
हत्तींच्या उपद्रवाच्या दिवसागणिक अनेक घटना घडत आहेत. त्याकडे वनविभाग वगळता कोणाचेही लक्ष नाही. तालुक्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष आहे. आमदार के. पी. पाटील यांच्या मतदारसंघात सातत्याने हत्तींचा उपद्रव आहे. जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांच्या मतदारसंघातील वझरे परिसरातही हत्तींचा उपद्रव असतो, तर चंदगडच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांच्या मतदारसंघातूनच हत्ती येण्यास सुरुवात होते. या तीनही आमदारांनी ठोस उपाययोजनेबाबत सभागृहात आवाज उठविला नसल्याबद्दल खेद व्यक्त होत आहे. रस्ते विकास म्हणजेच खरा विकास समजून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीकडे दुर्लक्ष होत आहे.
जनजागृती हवी, गैरसमज दूर व्हावेत
वनविभागाने हत्तींना माघारी पाठविण्याची मोहीम राबविण्यापेक्षा हत्ती बिथरू नये, यासाठी तीनही तालुक्यांत जनजागृती व जनतेमधील गैरसमज दूर केले पाहिजेत. हत्ती का येतात, याचा अभ्यास करून उपाययोजना राबविण्यासाठी जनचळवळ उभी करण्याची गरज आहे. पर्यावरण संतुलन बिघडल्याचा हा परिणाम आहे.
- कॉ. संपत देसाई, निमंत्रक, पर्यावरण संवर्धन संघर्ष समिती