कोनेवाडीत हत्तींकडून नुकसान
By Admin | Updated: November 29, 2014 00:31 IST2014-11-29T00:16:30+5:302014-11-29T00:31:16+5:30
भात फस्त : बांबूची बेटे, झोपडीचेही नुकसान; शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ

कोनेवाडीत हत्तींकडून नुकसान
चंदगड : कोनेवाडी (ता. चंदगड) येथील आण्णाप्पा रामा गोसावी या शेतकऱ्याचे शेतातील खळ्यावरच मळून ५० पोती भरून ठेवलेले भात काल रात्री चार हत्तींच्या कळपाने फस्त केले. याबरोबरच बांबूची बेटे व झोपडीचे या हत्तींनी मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. वर्षभर राबून पिकविलेले भातच हत्तींनी खाऊन फस्त केल्याने या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, काल अडकूर, विझणे परिसरात नुकसान केलेल्या या हत्तींनी आज, शुक्रवारी रात्री अडकूर, आमरोळी, केंचेवाडी, नागनवाडी, आसगाव मार्गे प्रयाण करीत रात्री नागनवाडी हद्दीत असलेल्या गोसावी शेतात खळ्यावर मळून ठेवलेली आण्णाप्पा गोसावी या शेतकऱ्याची ५० भात पोती खावून फस्त केली आणि उर्वरित भात अस्ताव्यस्त पसरून मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्यानंतर हत्तींनी पुन्हा बांधावर असलेली बांबूची बेटे खाऊन फस्त केली. जवळच असलेल्या या शेतकऱ्यांच्या झोपड्याही या हत्तींनी उद्ध्वस्त करून टाकली.
दरम्यान, हत्तीने केलेल्या नुकसानीचे पंचनामे वनक्षेत्रपाल सी. जी. गुजर, वनरक्षक आर. एम. सुकाळे यांनी केले आहे.
अडकूर परिसरातही टस्कराकडून नुकसान
अडकूर परिसरातील विंझणे येथील गोविंद आप्पा निकम, वसंत गणपती निकम, वसंत बाबू आमरोळकर, शंकर बाबू शिंदे, शशिकांत दत्तू पोवार, जोतिबा गोपाळ सुतार, महादेव बाबू शिंदे, पांडुरंग भुजंग शिंदे, बंडू कृष्णा नाईक, लक्ष्मण रावजी जाधव या शेतकऱ्यांचा ऊस, नाचना, काजूची झाडे यांचे टस्कर हत्तीने नुकसान केले आहे.