लाटगाव येथे घरावर हत्तीचा हल्ला
By Admin | Updated: January 20, 2015 23:33 IST2015-01-20T01:00:37+5:302015-01-20T23:33:59+5:30
रात्रभर भीतीच्या छायेत : प्रसंगावधान राखल्याने देसाई कुटुंबीय बचावले; बैलगाडी मोडली, केळी उद्ध्वस्त

लाटगाव येथे घरावर हत्तीचा हल्ला
आजरा : लाटगाव (ता. आजरा) येथे रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सुभाष भीमराव सरदेसाई यांच्या घराला हत्तीने लक्ष्य बनवीत घरावर व घराच्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तूंवर हल्ला चढविला. यामध्ये घराच्या भिंतीला तडा गेला असून ती काहीशी ढासळल्याने हलली आहे. हत्तीने बैलगाडी, नारळाची झाडे यांचे मोठे नुकसान केले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास हत्ती सातेवाडी लाटगाव येथील जंगलातून थेट आनंदा दादासो देसाई यांच्या सातेवाडी हद्दीतील ऊसपिकात प्रवेश केला. गावापासून दूर शेतात हत्ती दिसल्याने शेतीकामाकरिता गेलेल्यांनी शेतातून गावाकडे पळ काढला. यावेळी हत्तीने आनंदा देसाई यांची बैलगाडी, काजूची झाडे, ऊस पिकाचे नुकसान केले. सूर्यकांत आण्णासोा सरदेसाई यांच्या शेतातील ऊस पिकाचा फडशा पाडत रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास शेतावर राहणाऱ्या सुभाष सरदेसाई यांच्या घरावर आपला मोर्चा वळविला.
हत्तीच्या चित्कारांनी शेतावर राहणारे सरदेसाई कुटुंबीय जागे झाले. हत्तीने दारातील नारळाच्या झाडांचे नुकसान केले. त्यांची बैलगाडी मोडून टाकली. घरामध्ये स्वत: सरदेसाई, त्यांच्या पत्नी कांचन व मुलगा असे तिघेजण होते. त्यांच्या घरापासून सुमारे १०० मीटर अंतरापर्यंत एकही घर नसल्याने ते होणारा प्रकार घरातून पाहत होते. हत्तीला त्यांची चाहूल लागताच त्याने घराच्या भिंतीला ढकलण्याचा प्रयत्न केला. यामध्ये घराच्या भिंतीला तडेही गेले.
दरम्यान, कुत्र्यांनी व गोठ्यात बांधलेल्या जनावरांच्या आवाजाने हत्तीने घरापाठीमागील जागेतून तासाभरानंतर जंगल गाठले. रात्रभर भीतीच्या छायेखाली असलेल्या सरदेसाई कुटुंबीयांनी सकाळी घराचा दरवाजा उघडून झाला प्रकार पाहिला.गावात दिवसभर भितीचे वातावरण होते. दरम्यान, वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी सरदेसाई कुटुंबीयांची भेट घेऊन झाल्या प्रकाराची माहिती घेतली. (प्रतिनिधी)