राज्याच्या सीमेवर इलेक्ट्रॉनिक तपासणी
By Admin | Updated: July 27, 2014 22:59 IST2014-07-27T22:48:20+5:302014-07-27T22:59:34+5:30
पृथ्वीराज चव्हाण : कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन

राज्याच्या सीमेवर इलेक्ट्रॉनिक तपासणी
कऱ्हाड : ‘परराज्यांना जोडणाऱ्या सीमांच्या ठिकाणी कर चुकवेगीरीला आळा घालण्यासाठी २२ इलेक्ट्रॉनिक तपासणी नाके राज्य शासन सुरू करणार आहे. त्यापैकी १३ नाक्यांचे काम पूर्ण झाले आहे,’ अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
कऱ्हाड येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी परिवहन मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार विक्रमसिंह पाटणकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार आनंदराव पाटील, परिवहन विभागाचे प्रधान सचिव डॉ. शैलेशकुमार शर्मा, प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे उपस्थित होते.
मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘कर व महसूल चुकवेगिरीला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कडक धोरण अवलंबले आहे. या धोरणानुसार परराज्यांच्या सीमांना जोडणाऱ्या रस्त्यांवर तपासणी नाके उभे करण्यात येणार आहेत. या नाक्यांवर वाहनांची तपासणी होईल. तसेच क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही हे तपासणी नाके लक्ष ठेवतील. विविध मार्गांवरील वाढते अपघात लक्षात घेता राज्यातील ३५ उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारा इलेक्ट्रॉनिक प्रशिक्षण विभाग सुरू करणार आहे.’
ते पुढे म्हणाले की,‘ कायद्याने या विभागाला मान्यता नाही. मात्र, अपघातांसह त्यामध्ये ठार किंवा जखमी होणारे लोक यांचे प्रमाण अधिक असल्याने ते कमी करण्यासाठी कायद्यात बदल करून इलेक्ट्रॉनिक प्रशिक्षण विभागाला मान्यता देण्यात येणार आहे. त्यासाठी एखादी खासगी संस्था पुढे आल्यास त्यांनाही प्राधान्य देण्याचा राज्य शासन विचार करेल. प्रशासन गतिमान व लोकाभिमुख होण्यासाठी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नव्याने रुजू होणाऱ्या अधिकाऱ्यांना दोन वर्षांचे प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणातून चांगले अधिकारी घडतील व त्यातूनच गतिमान प्रशासनाची निर्मिती होईल. यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचाही समावेश करणार आहे. इतर विभागांप्रमाणेच परिवहन विभाग राज्याला महसूल मिळवून देणारा विभाग आहे. त्यामुळे या विभागामार्फत लोकांना जास्तीत जास्त सोयी-सुविधा देण्याचा राज्य शासन प्रयत्न करणार आहे.’
यावेळी परिसरातील ग्रामस्थांसह विविध विभागांतील शासकीय अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)