शेतीपंपांना पूर्ण दाबाने मिळणार वीज
By Admin | Updated: May 8, 2014 12:16 IST2014-05-08T12:16:13+5:302014-05-08T12:16:13+5:30
‘महावितरण’ची माहिती : ‘जनसुराज्य’चे आंदोलन

शेतीपंपांना पूर्ण दाबाने मिळणार वीज
कोल्हापूर : शेतीपंपांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनी अग्रेसर आहे, दोन उपकेंद्रांची कामे पूर्ण झाली असून आणखी चार उपकेंद्रे सुरू करणार आहे. त्यामुळे आगामी काळात उपकेंद्रांच्या कार्यक्षेत्रातील शेतकर्यांना पूर्ण दाबाने वीजपुरवठा होईल, अशी ‘महावितरण’च्यावतीने हमी दिल्याची माहिती जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी दिली आहे. शेतकर्यांच्या नावे खर्च होणार्या विजेचे नेमके मोजमाप काय, विहिरीवरील विजेचा वापर नगण्य असताना बारमाही बिल का घेता, पूर्ण दाबाने वीजपुरवठा करा, आदी मागण्यांसाठी जनसुराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील यांनी ‘महावितरण’च्या विभागीय कार्यालयाला निवेदन दिले होते. यावर, शेतीपंपांच्या मोजमापासाठी मीटर बसविण्यात आलेली आहेत. तसेच नवीन कनेक्शन जोडणी करणार्या शेतकर्यांना मीटर सक्तीचे असल्याने शेतकरी जेवढी वीज वापरतील तेवढेच बिल येते. पूर्ण दाबाने वीजपुरवठा होण्यासाठी करवीर तालुक्यातील बोलोली व शाहूवाडी तालुक्यातील धावडे अशी दोन उपकेंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. त्यामुळे या उपकेंद्रांच्या कार्यक्षेत्रात येणार्या गावांना योग्य दाबाने वीजपुरवठा होत आहे तसेच पायाभूत आराखडा दोन अंतर्गत नव्याने ३३/११ ची चार उपकेंद्र मंजूर आहेत. यापैकी निगवे (ता. करवीर) व पुशिरे (ता. पन्हाळा) जागेचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर जादा रोहित्रांची कामे मंजूर असून त्यापैकी २१ रोहित्रांची कामे प्रगतिपथावर आहेत. त्यामुळे शेतीपंप ग्राहकांना योग्य दाबाने वीजपुरवठा करता येणार आहे. या विभागांतर्गत गंजलेले पोल, खराब तारा बदलण्यासाठी स्पर्धात्मक निविदा परिमंडल कार्यालयाने काढलेली असून, ती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कामकाजास सुरुवात होणार असल्याचे ‘महावितरण’कडून कळवण्यात आल्याची माहिती संजय पाटील यांनी दिली. (प्रतिनिधी)