पश्चिम महाराष्ट्रातील ८० हजार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:36 IST2021-02-26T04:36:40+5:302021-02-26T04:36:40+5:30

कोल्हापूर : एक एप्रिलपासून एकही बिल न भरलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील ८० हजार वीजग्राहकांना गेल्या २३ दिवसांत वीज कनेक्शन तोडून ...

Electricity disconnection of 80,000 customers in Western Maharashtra | पश्चिम महाराष्ट्रातील ८० हजार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले

पश्चिम महाराष्ट्रातील ८० हजार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले

कोल्हापूर : एक एप्रिलपासून एकही बिल न भरलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील ८० हजार वीजग्राहकांना गेल्या २३ दिवसांत वीज कनेक्शन तोडून महावितरणने झटका दिला आहे. १४४ कोटी ९२ लाखांच्या थकबाकीसाठी ही कारवाई केली आहे. याच कालावधीत विभागातील साडेचार लाख प्रामाणिक ग्राहकांनी ५७९ कोटी ९३ लाखांची बिले भरून महावितरणला सहकार्य केले आहे.

वीज बिल माफी होईल न होईल तोवर बिलांच्या वसुलीचा झपाटाच महावितरणने लावला आहे. त्यामुळे एकाच वेळी बिले भरण्यासाठी विनंती आणि दुसऱ्या बाजूला हातात पक्कड घेऊन कनेक्शन तोडून थकबाकीदारांच्या घरीदारी अंधार केला जात आहे. वीज कनेक्शन पुन्हा जोडायचे असल्यास दंडाची रक्कमही घेतली जात आहे. त्यामुळे कनेक्शन तोडण्याची आणि दंड भरण्याची नामुष्की टाळण्यासाठी थकीत बिलांचा भरणा करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.

थकीत वीज बिलांचा भरणा करून सहकार्य करा, या महावितरणच्या आवाहनाला प्रतिसाद देत पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ४ लाख ५४ हजार थकबाकीदार वीज ग्राहकांनी गेल्या २३ दिवसांमध्ये ५७९ कोटी ८८ लाख रुपयांचा भरणा केला आहे.

चौकट ०१

एकही बिल न भरलेले साडेनऊ लाख...

सद्य:स्थितीत पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांमध्ये घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक २६ लाख ४७ हजार वीज ग्राहकांकडे एकूण १६९० कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामध्ये अद्यापही १ एप्रिल २०२० पासून एकही वीज बिल न भरलेल्या ९ लाख ३२ हजार वीज ग्राहकांकडे अद्याप ६८७ कोटी ९७ लाख रुपये थकीत आहेत.

आतापर्यंत ५७९ कोटी वसुली

जिल्हा : ग्राहक : भरलेले बिल

पुणे : १ लाख ६९ हजार ५३३ : ३०१ कोटी ९१ लाख

सातारा : ५९ हजार २६५ : ५१ कोटी ५२ लाख

कोल्हापूर : ७८ हजार ९०९ : ८४ कोटी ९६ लाख

सांगली : ६० हजार ५६३ : ६० कोटी ३१ लाख

शनिवार व रविवारी वीज बिल भरणा केंद्र सुरू

चालू व थकीत वीज बिलाचा भरणा करण्यासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील महावितरणचे सर्व अधिकृत वीज बिल भरणा केंद्र सार्वजनिक सुटीच्या दिवशी शनिवारी (दि. २७) व रविवारी (दि.२८) कार्यालयीन वेळेत सुरू राहणार आहेत.

Web Title: Electricity disconnection of 80,000 customers in Western Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.