घरगुती दराने सार्वजनिक गणेश मंडळांना वीजजोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:30 IST2021-09-08T04:30:46+5:302021-09-08T04:30:46+5:30

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने तात्पुरती वीजजोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे मंडळाने अर्ज करुन अधिकृत वीजजोडणी ...

Electricity connection to public Ganesh Mandals at domestic rate | घरगुती दराने सार्वजनिक गणेश मंडळांना वीजजोडणी

घरगुती दराने सार्वजनिक गणेश मंडळांना वीजजोडणी

कोल्हापूर : सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने तात्पुरती वीजजोडणी दिली जाणार आहे. त्यामुळे मंडळाने अर्ज करुन अधिकृत वीजजोडणी घ्यावी, असे आवाहन महावितरणने मंडळांना केले आहे. अनधिकृत घेतल्याचे आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.

गणेश मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत कायदा २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे. गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. काही कारणास्तव वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीजप्रवाह लघुदाब वीजवाहिनीमध्ये प्रवाहित होतो व त्यातून जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण होते. संततधार पाऊस व जोरदार वाऱ्यामुळे मंडपातील वीजयंत्रणेसह सार्वजनिक ठिकाणी लावलेल्या लाईटिंगचे वायर्स खाली झुकलेले नाही किंवा विस्कळीत झालेले नाहीत याची दैनंदिन तपासणी करावी.

गणेशोत्सवाच्या काळात मंडपात शॉर्टसर्किट होणे, विद्युत वायरिंगमध्ये बिघाड होणे, आदी कारणांमुळे संभाव्य धोके टाळण्यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी संबंधित क्षेत्रातील महावितरणचे अभियंता व कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी क्रमांक नोंदवून ठेवावेत. तसेच तक्रारींसाठी किंवा तातडीच्या मदतीची गरज भासल्यास २४ तास उपलब्ध असलेले १९१२ किंवा १८००१०२३४३५ किंवा १८००१०२३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

चौकट

वीजजोडणीसाठी मंडळांनी ही दक्षता घ्यावी

मंडपाची व रोषणाईसाठी विद्युत व्यवस्था व संच मांडणी ही अधिकृत विद्युत कंत्राटदारांकडून करून घ्या.

मंडपातील वीजयंत्रणेचे अर्थिंग सुस्थितीत असल्याची खात्री करून घ्यावी.

स्वीचबोर्डच्या मागे प्लायवूड किंवा लाकडी फळी लावल्याची खात्री करून घ्यावी.

मंडळाच्या अंतर्गत वायरचे इन्सुलेशन खराब झाल्यास अशा वायर्समधून मंडपाच्या लोखंडी पत्र्यांमध्ये किंवा ओल्या वस्तूंमध्ये विद्युत प्रवाह येऊ शकतो. हा प्रकार टाळण्यासाठी वायर्सचे जोड काढून टाकावेत किंवा जोड द्यायचा असल्यास योग्य क्षमतेच्या इन्सुलेशन टेपने जोड देण्यात यावा.

Web Title: Electricity connection to public Ganesh Mandals at domestic rate