यंत्रमाग उद्योगाला जुन्या दरानेच वीज बिले
By Admin | Updated: August 1, 2015 00:51 IST2015-08-01T00:51:25+5:302015-08-01T00:51:25+5:30
ऊर्जामंत्र्यांचे आदेश : जुन्या दराच्या वीज बिल फरकासाठी २०० कोटींच्या अनुदानाची तरतूद

यंत्रमाग उद्योगाला जुन्या दरानेच वीज बिले
इचलकरंजी : यंत्रमाग उद्योगाची वीज बिले जुन्या दरानेच भरून घेण्यासाठी २०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल आणि हा विषय कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येणार असल्याचा निर्णय ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधिमंडळात झालेल्या बैठकीत दिला, अशा आशयाची माहिती आमदार सुरेश हाळवणकर यांनी एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस दिली आहे.
यंत्रमाग उद्योगाचे वीजदर कोणत्याही परिस्थितीत वाढणार नाहीत, अशी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिलेली ग्वाही हवेत विरते न विरते तोच यंत्रमागधारकांना प्रति युनिट ६२ पैसे वाढीव दराची बिले मिळाल्यामुळे येथे चांगलीच खळबळ उडाली. वाढीव वीजदराचा इचलकरंजीतील यंत्रमाग उद्योजकांना महिन्याला तीन कोटी रुपयांचा फटका बसणार आहे, अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २८ जुलै रोजी प्रसिद्ध झाले होते. त्याची दखल घेत आमदार हाळवणकर यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याकडे शुक्रवारी बैठक आयोजित केली होती.
आमदार हाळवणकर यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, वीज नियामक आयोगाने १ जनूपासून वीजदराची पुनर्रचना केली. यंत्रमागाच्या वीजदरामध्ये सुधारणा केली असली, तरी आयोगाने ठरविलेल्या तसेच राज्य शासनाच्या दरामध्ये वेगवेगळे कर, चार्जेस आकारले जात असल्याने वीजदर कमी न होता उलट वाढत असल्याचे आमदार हाळवणकर यांनी ऊर्जामंत्र्यांच्या निदर्शनास आणले. तसेच याबाबत विधानसभेत मुद्दा उपस्थित केला असताना शासन यंत्रमागाच्या वीजदरात कोणत्याही परिस्थितीत वाढ होऊ देणार नाही. त्यासाठी प्रसंगी वीजदराचे परिपत्रक रद्द करण्याचे किंवा अनुदान देण्याचे आश्वासन मंत्री बावनकुळे यांनी दिले होते. त्यानंतर सुद्धा यंत्रमागधारकांना वाढीव वीजदराची बिले लागू झाली.
आमदार हाळवणकर यांनी सूचित केल्याप्रमाणे विधिमंडळात झालेल्या बैठकीसाठी ऊर्जा खात्याचे प्रधान सचिव, ‘महावितरण’चे वाणिज्य मुख्य अभियंता सतीश बापट, संचालक अभिजित देशपांडे, आमदार अनिल बाबर (विटा), वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, आदी उपस्थित होते. बैठकीत आमदार हाळवणकर यांनी यंत्रमागाच्या वाढीव वीजदरामुळे निर्माण झालेल्या अडचणींची माहिती मंत्री बावनकुळे यांना दिली. तसेच सभागृहातील आश्वासनाची आठवण केली. त्यावर ‘महावितरण’च्या अधिकाऱ्यांनी यंत्रमागाला जुन्या दराने वीज बिलांची आकारणी करण्यासाठी २०० कोटी रुपयांच्या अनुदानाची गरज असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी सांगितले. अनुदानाचा हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये त्वरित आणण्याचे आदेश दिले. तसेच यंत्रमागधारकांकडून जुन्या दराने वीज बिलांची आकारणी करण्याचेही आदेश दिले. तसेच कोणत्याही यंत्रमागधारकाचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे सांगितले. (प्रतिनिधी)
सूतगिरण्यांनाही सवलतीचा वीजदर शक्य
याच बैठकीमध्ये वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सूतगिरण्या व वस्त्रोद्योगातील इतर घटकांना सवलतीचा वीजदर द्यावा, अशी मागणी केली. तेव्हा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वस्त्रोद्योगातील विजेचे दर कमी राहतील, असे आश्वासन दिले.