दरवाढीविरोधात शुक्रवारी वीजबिलांची होळी
By Admin | Updated: February 25, 2015 00:07 IST2015-02-24T23:47:55+5:302015-02-25T00:07:29+5:30
इरिगेशन फेडरेशन आक्रमक : शेतकरी, उद्योजक होणार सहभागी

दरवाढीविरोधात शुक्रवारी वीजबिलांची होळी
कोल्हापूर : वीज दरवाढ व वीज सवलत रद्द करण्याच्या ‘महावितरण’च्या निर्णयाविरोधात इरिगेशन फेडरेशनच्यावतीने शुक्रवारी ‘महावितरण’च्या ताराबाई येथील कार्यालयासमोर वीज बिलांची होळी करणार असल्याची माहिती फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील व बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
महावितरण’चे सर्वच ग्राहकांसाठीचे दर हे शेजारीला राज्यापेक्षा दुप्पट आहेत. हे दर सर्वसामान्य माणसाला झेपणारे नाहीत. इतर राज्यांप्रमाणे विजेचे दर दोन वर्षे स्थिर ठेवणे गरजेचे आहे. शासन आता वैयक्तिक सोलर पंप ही योजना आणू पाहत आहे; पण ही योजना शेतकऱ्यांना परवडणारी नाही. त्याची देखभाल व दुरुस्ती ही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा विषय आहे. यापेक्षा फिडरनिहाय अथवा गावनिहाय सोयीस्कर शेतकऱ्यांच्या गटासाठी १ ते ३ मेगावॅट क्षमतेचे सोलर प्रकल्प उभे करावेत, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.
‘महावितरण’ने कृषी पंपांबरोबरच अन्य ग्राहकांची वीज सवलत ताबडतोब सुरू करावी, सध्या असणारे वीज दर किमान दोन वर्षांसाठी स्थिर ठेवावेत; अन्यथा आंदोलन उभे करण्याचा इशारा पाटील यांनी दिला. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी दुपारी बारा वाजता ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व प्रताप होगाडे यांच्या उपस्थित ‘महावितरण’च्या ताराबाई पार्क येथील कार्यालयासमोर जिल्ह्यातील शेतीपंपधारक, उद्योजक वीज बिलांची होळी करणार आहेत. तरी जिल्ह्यातील शेतकरी, ग्राहक व उद्योजकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन चंद्रकांत पाटील व बाबासाहेब पाटील यांनी केले. आर. जी. तांबे, सखाराम चव्हाण, आर. के. पाटील, एस. ए. कुलकर्णी, विक्रांत पाटील, महादेव सुतार, मारुती पाटील उपस्थित होते.