संकेश्वरच्या प्रसन्नाने बनविली इलेक्ट्रिकल कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:17 IST2021-06-17T04:17:28+5:302021-06-17T04:17:28+5:30
विलास घोरपडे संकेश्वर : संकेश्वरचे सुपुत्र प्रसन्ना दयानंद केस्ती यांनी कल्पकतेने कच्च्या रस्त्याचा दमदार साथी अशी इलेक्ट्रिकल कार बनवली ...

संकेश्वरच्या प्रसन्नाने बनविली इलेक्ट्रिकल कार
विलास घोरपडे
संकेश्वर : संकेश्वरचे सुपुत्र प्रसन्ना दयानंद केस्ती यांनी कल्पकतेने कच्च्या रस्त्याचा दमदार साथी अशी इलेक्ट्रिकल कार बनवली आहे. त्यांच्या या अभिनव कल्पकतेमुळे संकेश्वरच्या आत्मनिर्भरतेच्या इतिहासातील ती सामान्यांची ‘कार’ अशी नोंद घ्यावी लागणार आहे.
सुमारे ३ लाख रुपये खर्चून ५ बाय ४ आकारात मेटलचा सांगाडा बनविला आहे. त्यास बुलेटची चाके बसवून १.३ एचपी मोटर व १२ वॅटच्या ४ बॅटरीचा वापर केला आहे. तसेच इलेक्ट्रिकल रिक्षाचे ब्रेक व जुन्या जीपच्या गिअरचा यामध्ये खुबीने वापर केला आहे.
दोन आरामी ही गाडी ५ तास फुल्ल चार्जिंग केल्यास ९० ते १०० कि. मी. धावते. बेळगावातील केस्ती इलेक्ट्रिकल वर्कशॉपमध्ये गेल्या ५ महिन्यांपासून ही गाडी बनविण्यात आली आहे. प्रदूषणविरहित तसेच चालविण्यास सोपी व हाताळण्यास हलकी असणाऱ्या या गाडीचे वजन केवळ ३०० किलो आहे. गाडीसाठी वापरण्यात आलेले फायबरचे साहित्य तेलंगणा येथून आणून बसविले आहे.
बालपणापासून नवनवीन प्रयोग करण्यात प्रसन्नाचा हातखंडा आहे. त्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संकेश्वर तर, बेळगावमध्ये अभियांत्रिकी तर, पुण्याच्या इंदिरा विद्यापीठातून ‘एमबीए’चे शिक्षण पूर्ण केले आहे. माजी नगराध्यक्ष कै. शिवयोगी केस्ती यांचे ते नातू आहेत.
-------------------------
फोटो ओळी : संकेश्वर येथील अभियंता प्रसन्ना केस्ती यांनी बनविलेली चार्जिंगवर चालणारी प्रदूषणविरहित जीप गाडी. क्रमांक : १६०६२०२१-गड-०५