निवडणुकांचा धडाका
By Admin | Updated: February 23, 2015 00:16 IST2015-02-22T23:52:09+5:302015-02-23T00:16:01+5:30
आजरा : सूतगिरणी, संघ, अर्बन बँक, जनता बँकेचा समावेश

निवडणुकांचा धडाका
ज्योतिप्रसाद सावंत - आजरा - तालुक्यात येत्या चार महिन्यांत २६ ग्रामपंचायतींसह अण्णा-भाऊ सहकारी सूतगिरणी, आजरा अर्बन बँक, आजरा तालुका खरेदी-विक्री संघ व जनता बँक या प्रमुख सहकारी संस्थांच्या निवडणुका होत असल्याने व सर्वच निवडणुका एकदमच आल्याने प्रमुख नेतेमंडळींची व्यूहरचना करताना दमछाक होणार आहे.
तालुक्यातील हालेवाडी, बेलेवाडी हु।।, वाटंगी, सिरसंगी, महागोंड, मुमेवाडी, हत्तीवडे, सुळे, निंगुडगे, सरोळी, किणे, होनेवाडी, चव्हाणवाडी, खोराटवाडी, जाधेवाडी, गवसे, देवर्डे, एरंडोळ, कोवाडे, कासारकांडगाव, चिमणे, हाळोली, मलिग्रे, मुरुडे, पेद्रेवाडी, देवकांडगाव येथील ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम मे व जून महिन्यांत जाहीर झाला आहे. प्रभाग आरक्षणाचा कार्यक्रमही पार पडला आहे.
आजरा सूतगिरणीचा निवडणूक कार्यक्रमही सुरू झाला आहे. एकीकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचा धुमधडाका चालू असताना याच धामधुमीत सूतगिरणीचा कार्यक्रम आहे. सूतगिरणीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न अण्णा-भाऊ संस्था प्रमुखांकडून सुरू आहे. आजरा तालुका खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. यावेळी तालुका संघाची निवडणूक जोरदार होणार हे स्पष्ट आहे. राष्ट्रवादींतर्गत अशोक चराटी व शिवसेना यांचा गट विरुद्ध जि. प. सदस्य मुकुंदराव देसाई, सुधीर देसाई, उदय पवार यांचा गट अशीच निवडणूक होण्याची चिन्हे आहेत.
जनता सहकारी बँकेच्या निवडणुकीचे नगारे वाजू लागले आहेत. जनता बँकेची निवडणूक नेहमीच चुरशीने झाली आहे. सद्य:स्थितीला राजकीय संदर्भ बदलत असल्याने जनता बँकेच्या निवडणुकीतही प्रचंड चुरस पाहावयास मिळणार आहे. एकंदर येत्या सहा महिन्यांत निवडणुकांचे तालुक्यात धूमशान उडणार, हे निश्चित.