निवडणूक कोल्हापुरात...अर्ज गगनबावड्यात
By Admin | Updated: March 17, 2015 00:06 IST2015-03-16T23:57:37+5:302015-03-17T00:06:53+5:30
सत्यशोधक बँकेची स्थिती : सहकार खात्याच्या कारभाराचा एक नमुना

निवडणूक कोल्हापुरात...अर्ज गगनबावड्यात
कोल्हापूर : येथील अॅड. शामराव शिंदे सत्यशोधक सहकारी बँकेचे मुख्यालय कोल्हापुरात आहे; परंतु या बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायला चक्क गगनबावड्याला जावे लागत आहे. कारण बँकेचे निवडणूक अधिकारी टी. डी. बल्लाळ असून, ते गगनबावड्याचे सहायक उपनिबंधक आहेत.सोमवारी पहिल्याच दिवशी या बँकेसाठी एकमेव अर्ज दाखल झाला आहे. शुक्रवार (दि.२०)पर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. बँकेच्या संचालक मंडळाच्या १४ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. जिल्हा कार्यालय असलेल्या या बँकेचे सुमारे सात हजार सभासद आहेत. निवडणूक १९ एप्रिलला व मतमोजणी २० एप्रिलला आहे. बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याचीच शक्यता जास्त आहे.या बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सहकार खात्याच्या कारभारावर प्रकाशझोत पडला आहे. आजपर्यंत सहकार खाते निवडणुकीत कसेही ‘मॅनेज’ करता येते, असे लोक उघडपणे बोलून दाखवत. आता राज्य शासनाने सहकार संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी कायद्याने स्वतंत्र निवडणूक प्राधिकरण स्थापन केले; परंतु त्यांच्याकडे स्वतंत्र मनुष्यबळ नसल्याने सहकार खात्याचीच यंत्रणा वापरून निवडणुकीचे काम पार पाडले जात आहे. त्यामुळेच बँक कोल्हापुरात व निवडणूक कार्यालय गगनबावड्यात, असे हास्यास्पद चित्र तयार झाले आहे. बल्लाळ यांच्याकडे सहायक निबंधकाची जबाबदारी आहे. स्थानिक तालुक्यातील कामे असल्याने त्यांना या बँकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र वेळ द्यायला अडचणी आहेत. त्यामुळे ते त्यांच्याकडे मूळ जबाबदारी आहेत त्याच कार्यालयात बसत असल्याने एखाद्याला या बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा झाल्यास गगनबावडा गाठायला लागत आहे. सहकार खात्याच्या हा गंमतीशीर प्रकाराची सभासदांतही चेष्टा होऊ लागली आहे. काहींच्यामते विरोधातील लोकांनी अर्जच दाखल करू नये, यासाठीही काही संस्था असे आपल्याला सोयीचे निवडणूक अधिकारी पुण्यात सहकार प्राधिकरणाच्या कार्यालयात बसून त्यांची आॅर्डर करून आणत आहेत. मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या संस्था आपल्या काखेतील अधिकाऱ्यांना व जिथे काहीच
पदरात पडणार नाही, अशा संस्था ठरावीक अधिकाऱ्यांना देण्याचे ‘राजकारण’ही जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सुरू आहे. (प्रतिनिधी)
मूळ जबाबदारीच्या कामाचा ताण
बॅँकेचे निवडणूक अधिकारी टी. डी. बल्लाळ असून, ते गगनबावड्याचे सहायक उपनिबंधक आहेत.
स्थानिक तालुक्यातील कामे असल्याने त्यांना या बँकेच्या निवडणुकीसाठी स्वतंत्र वेळ द्यायला अडचणी आहेत.
यामुळे ते त्यांच्याकडे मूळ जबाबदारी आहे, त्याच कार्यालयात बसत असल्याने एखाद्याला या बँकेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करायचा झाल्यास गगनबावडा गाठायला लागत आहे.