निवडणूक दिवाळी आधी की नंतर हा गुंता

By Admin | Updated: August 17, 2014 00:54 IST2014-08-17T00:53:41+5:302014-08-17T00:54:53+5:30

सरकार व आयोगामध्ये मतभिन्नता : त्यावरच लागू होणार आचारसंहिता

Elections to Diwali before that after this Gunta | निवडणूक दिवाळी आधी की नंतर हा गुंता

निवडणूक दिवाळी आधी की नंतर हा गुंता

विश्वास पाटील /  कोल्हापूर
विधानसभेची निवडणूक दिवाळीच्या आधी होणार की नंतर यावरच आचारसंहिता कधी लागू होणार याची तारीख निश्चित होणार आहे. तोच गुंता न सुटल्याने आचारसंहिता कधी लागू होणार याबद्धल संभ्रमावस्था तयार झाल्याचे चित्र आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मतदान दिवाळी झाल्यानंतर व्हावे असे वाटते. कारण महाराष्ट्र विधानसभेची मुदत ७ डिसेंबरपर्यंत आहे. दिवाळी २४ आॅक्टोबरला आहे. त्यामुळे दिवाळी झाल्यानंतर मतदान झाले तरी नवे सभागृह मुदतीत अस्तित्वात येऊ शकते. त्यामुळे आताच आचारसंहिता लागू करण्याची घाई न केली जाऊ नये, असे मुख्यमंत्र्यांना वाटते, असे सूत्रांचे म्हणणे आहे; परंतु निवडणूक आयोग निवडणूक दिवाळीपूर्वीच व्हावी अशा प्रयत्नात आहे. दसरा ३ आॅक्टोबरला आहे. त्यामुळे दसरा-दिवाळीमध्ये कधीतरी मतदान होणार असेल तर आचारसंहिता २१ किंवा २२ आॅगस्टला लागू होऊ शकते, अशा हालचाली आहेत.
सहकार संस्थांच्या निवडणुकीचा निर्णयही याच निर्णयाशी निगडीत आहे. राज्य सरकारला या निवडणुका विधानसभा निवडणुकीनंतर हव्या आहेत. नव्या सहकार कायद्यानुसार या निवडणुका घेण्यासाठी शासनाने सहकार निवडणूक प्राधिकरणही स्थापन केले आहे. त्याचे आयुक्त म्हणून मधुकर चौधरी यांची नियुक्ती केली आहे. त्यांना सुमारे ४५ कर्मचारी दिले आहेत. प्राधिकरणासाठी सहनिबंधक म्हणून वाडेकर यांची नियुक्तीही केली आहे. अतिरिक्त निबंधक पद मात्र अजून भरलेले नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्राधिकरणाचा कारभार ज्याआधारे चालणार आहे, त्या निवडणूक नियमांना अजून मंजुरी मिळालेली नाही. हे नियम सहकार खात्याने तयार करून शासनाकडे पाठविले. त्यास शासनानेही मंजुरी दिली आहे; परंतु त्यावर जोपर्यंत राज्यपालांची सही होत नाही तोपर्यंत ते लागू होत नाहीत. त्यावर ज्यादिवशी राज्यपालांची सही होईल त्याच दिवसांपासून हे नियमही लागू होतील. तसेच त्या निवडणूक प्राधिकरणाचे कामही सुरू होईल. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्याआधी एक दिवस हे नियम लागू करण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यामुळे निवडणूक होईपर्यंत सहकार निवडणूक प्राधिकरण या संस्थांच्या निवडणुकीची तयारी करू शकते. विधानसभेला आपल्या ताब्यातील या संस्थांचा उपयोगही करता येऊ शकतो. त्यानंतर काय व्हायचे ते होईल, असा हिशेब सरकारने केला आहे. राज्यातील सुमारे वीस जिल्हा बँका, साखर कारखाने व गोकुळ दूध संघांसह अनेक संघाची निवडणूक होणार आहे. या संस्था आता दोन्ही काँग्रेसच्या ताब्यात आहेत.

Web Title: Elections to Diwali before that after this Gunta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.