जिल्ह्यातील ६२४ संस्थांची सोमवारपासून निवडणूक प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:28 IST2021-09-14T04:28:38+5:302021-09-14T04:28:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची सोमवार (दि. २०) पासून निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश राज्य ...

जिल्ह्यातील ६२४ संस्थांची सोमवारपासून निवडणूक प्रक्रिया
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : मुदत संपलेल्या सहकारी संस्थांची सोमवार (दि. २०) पासून निवडणूक प्रक्रिया सुरु करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधीकरणाने दिले आहेत. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील ६२४ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. ज्या संस्थांचे नामनिर्देशन प्रक्रिया सुरु होती, अशा संस्था वगळून उर्वरित संस्थांची ३१ ऑगस्ट २०२१ या आर्हता दिनांकावर मतदार यादी अंतिम केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात गव्हर्मेंट सर्व्हंटस बँकेसह ‘शरद’ व ‘डी. वाय. पाटील’ साखर कारखान्यांची निवडणूक होत आहे.
कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका गेली पावणे दोन वर्षे लांबणीवर गेल्या होत्या. अनेक वेळा मुदतवाढ देण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्यात डिसेंबर २०२१ अखेर विविध गटातील ५९६५ संस्था निवडणुकीस पात्र आहेत. पहिल्या टप्प्यात ६२४ संस्थांची प्रक्रिया सुरु होणार असून यातील बहुतांशी संस्थांच्या मतदार यादीचा कार्यक्रम नव्याने सुरु करावा लागणार आहे. ज्या संस्थांचे नामनिर्देशन प्रक्रिया सुरु होती, त्या सोडून इतर संस्थांच्या मतदार यादीत ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंतचे सभासद पात्र ठरणार आहेत. पहिल्या टप्प्यात गव्हर्मेंट सर्व्हंटस बँक, पार्श्वनाथ बँक, शरद कारखाना, डी. वाय. पाटील कारखाना आदींच्या निवडणुका होणार आहेत. कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम कारखाना पहिल्या टप्प्यात असला तरी मतदार यादीबाबत न्यायालयात प्रकरण असल्याने ते न्यायालयाच्या आदेशानुसारच होणार आहे.
पहिल्या टप्प्यात होणाऱ्या गटनिहाय संस्था-
‘अ’ - १२
‘ब’- २२३
‘क’ - १९०
‘ड’ - १९९
एकूण - ६२४
डिसेंबर २०२० अखेर निवडणुकीस पात्र संस्था-
‘अ’- १८
‘ब’ - १०७५
‘क’ - २०२०
‘ड’ - १०१९
एकूण - ४१३२
‘त्या’ १८३३ संस्थांबाबत स्वतंत्र आदेश
जानेवारी ते डिसेंबर २०२१ या कालावधीत संचालक मंडळाची मुदत संपलेल्या १८३३ संस्था आहेत. या संस्थांबाबत निवडणूक प्राधान्य, मनुष्यबळ व साधन सामुग्री विचारात घेऊन प्राधिकरण स्वतंत्र आदेश काढणार आहे.
कोट-
राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारपासून सुरु करत आहोत. मतदार याद्या अद्यावत बाबत तालुकास्तरावर सूचना देण्यात आल्या आहेत.
- अमर शिंदे (जिल्हा उपनिबंधक, कोल्हापूर).