निवडणुकीची तयारी पूर्ण
By Admin | Updated: October 20, 2015 00:14 IST2015-10-20T00:10:51+5:302015-10-20T00:14:45+5:30
जे. एन. सहारिया : संवेदनशील भागात जादा पोलीस; सदोष यादीला मतदारही जबाबदार

निवडणुकीची तयारी पूर्ण
कोल्हापूर : महानगरपालिकेची निवडणूक भयमुक्त आणि पारदर्शक वातावरणात पार पडावी याकरिता कराव्या लागणाऱ्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या असून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले. शहराच्या संवेदनशील भागांत जादा पोलीस कुमक देण्यात येईल, त्यामुळे कोणी प्रलोभन आणि दबावाला बळी पडणार नाहीत, असे सहारिया म्हणाले.
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांच्यासह राज्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित, मुख्य गृहसचिव के. पी. बक्षी सोमवारी कोल्हापुरात आले होते. या सर्वांनी शासकीय विश्रामगृहावर निवडणूक आढावा बैठक घेऊन माहिती करून घेतली.
याप्रसंगी मनपा आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हाधिकारी अमित सैनी, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीव वर्मा, पोलीस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्यासह सातही क्षेत्रीय कार्यालयांतील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मनपा निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, मतदार आणि उमेदवारांच्यात विश्वासाचे वातावरण निर्माण झाले पाहिजे तसेच कोणत्याही प्रलोभनाला, दबावाला बळी न पडता मतदारांनी मतदान करावे.
यासाठी निवडणूकयंत्रणेतील कर्मचारी विश्वास देण्याचे काम करत आहेत. निवडणुकीच्या कामकाजाचे जे बारा टप्पे ठरविण्यात आले होते, त्यापैकी नऊ टप्प्यांचे काम पूर्ण झाले. आता मतदान आणि मतमोजणी ही दोन महत्त्वाची कामे राहिली आहेत, असे सहारिया म्हणाले.
मनपासाठी ३७८ मतदार केंद्रांवर मतदान होणार असून, मतदानासाठी आवश्यक ते मनुष्यबळ, वाहने, मतदान यंत्रे आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. चांगल्या पद्धतीने निवडणूक पार पडेल, अशी तयारी झाली आहे. आता पुढच्या काळात आमचे सर्व लक्ष हे आचारसंहिता अंमलबजावणी करण्यावर असेल. जास्तीत जास्त नियंत्रण ठेवले जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्रारूप तसेच अंतिम मतदार यादी चुकांबाबत सहारिया यांना विचारले असता मतदारयादीतील चुकांना आयोगाचे अधिकारी जसे काही प्रमाणात जबाबदार आहेत तसे मतदारसुद्धा जबाबदार असल्याचे ते म्हणाले.
१ आॅगस्ट २०१५ ची यादी आपण निवडणुकीसाठी ग्राह्य धरली आहे. ही यादी भारत निवडणूक आयोगाने तयार केली आहे. यादी बिनचूक व्हावी म्हणून त्यात सुधारणा करण्यात आल्या तरीही काही चुका राहू शकतात. मतदारयादीतील चुकांना मतदारही जबाबदार असतात, कारण तीस टक्के लोक याद्यांकडे लक्षच देत नाहीत, असा दावा त्यांनी केला.
खुलासा आल्यावर मुश्रीफांवर कारवाई
माजी मंत्री हसन मुश्रीफ व आपले फोनवर बोलणे झाले त्यावेळी आपण ‘कलेक्टर पागल हैं क्या?’ असे शब्द वापरले होते का, असे विचारता, आपण तसे म्हणालो नव्हतो. चुकीचे वाक्य माझ्या तोंडी घालून मुश्रीफ यांनी दिशाभूल केली असल्याने त्यांना नोटीस लागू केली असून, त्यांचा खुलासा येऊ दे मग काय करायचे ते पाहू, असे सहारिया म्हणाले.
अद्ययावत मतदार याद्यांचे काम सुरू
राज्यात पुढील वर्षी ऐशी टक्के जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होत आहेत. त्यासाठी मतदार याद्या अद्ययावत करण्याचे काम ८ आॅक्टोबरपासून ७ नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. मतदारांनी याबाबत दक्ष राहून आपले नाव मतदार यादीत आहे का याची खात्री करून घ्यावी. कारण पुढील निवडणुकीसाठी याच याद्या वापरल्या जाणार आहेत, असे आवाहनही त्यांनी केले.