‘कुंभी-कासारी’च्या निवडणुकीला मुहूर्त मिळेना
By Admin | Updated: July 25, 2015 01:13 IST2015-07-24T23:15:37+5:302015-07-25T01:13:32+5:30
विरोधक आक्रमक : तांत्रिक त्रुटी नसताना निवडणूक प्रक्रिया संथगतीने चालल्याचा आरोप

‘कुंभी-कासारी’च्या निवडणुकीला मुहूर्त मिळेना
प्रकाश पाटील - कोपार्डे -कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत जानेवारी २०१५ मध्ये संपली आहे; मात्र संस्था प्रतिनिधीच्या मुद्द्यावरून कारखाना प्रशासन न्यायालयात गेल्याने व एक-दोन वर्षांपूर्वी मुदत संपलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका प्रथम घेण्यास प्राधान्य दिले गेल्याने कुंभीच्या निवडणुकीबाबत साशंकता होती. मात्र, हे सर्व अडथळे बाजूला होऊन कच्ची, पक्की मतदार यादी प्रसिद्ध होऊन २० ते २५ दिवस उलटून गेले असले, तरी कार्यक्रम जाहीर न झाल्याने कुंभीच्या निवडणुकीला मुहूर्त कधी, अशी चर्चा सुरू आहे.
कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या सन २०१५ ते २०२० या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया रीतसर सुरू झाली. यातून कच्ची मतदार यादी जाहीर करून १९ जून २०१५ ला पक्की मतदार यादीही तयार करण्यात आली. साखर सहसंचालक कार्यालयाकडून निवडणूक अधिकारी नेमणे व कार्यक्रम जाहीर करण्यासाठी साखर आयुक्तालय व सहकार प्राधिकरणाला कळविण्यात आले. वास्तविक पक्की मतदार यादी जाहीर केल्यानंतर पुढील दहा दिवसांत निवडणूक अधिकारी नेमून कार्यक्रम जाहीर करणे क्रमप्राप्त होते. मात्र, पक्की मतदार यादी जाहीर होऊन २० ते २५ दिवस झाले असले, तरी निवडणूक अधिकारी नेमल्यानंतर निवडणूक कार्यक्रम बनवून तो प्रसिद्ध झाला नसल्याने निवडणूक लांबणीवर पडली आहे का? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहेत.
विरोधक मात्र ‘कुंभी-कासारी’च्या निवडणुकीबाबत वारंवार प्रशासनाचे दरवाजे ठोठावताना दिसतात. यावेळी प्रशासन जागे होते व जुजबी हालचाली सुरू होतात, असे चित्र पाहायला मिळते. मतदार यादी प्रसिद्ध होण्यापूर्वीही अशाच घडामोडी घडल्या होत्या. कुंभी बचाव मंचने साखर सहसंचालक, सहकार आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडे वारंवार धावा बोलल्यानंतरच कच्ची व पक्की मतदार यादी प्रसिद्ध झाली. मात्र, यादरम्यान सत्ताधारी गटाचे मौन, तर शेतकरी संघटनेने पावसाळा, पंढरपूर आषाढी वारी यांचे कारण पुढे करून निवडणूक पावसाळ्यानंतर घेण्याचे निवेदन दिले; पण बचाव मंचने निवडणूक वेळेतच झाली पाहिजे यासाठी उपोषणाचा इशारा दिल्यानंतर कच्ची-पक्की मतदार यादी प्रसिद्ध झाली. मात्र, यानंतर दहा दिवसांत निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन आॅगस्ट महिन्यात शेवटच्या आठवड्यात ही निवडणूक होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती.
मात्र, निवडणूक अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विद्युत वरखडे यांची नेमणूक झाली असली तरी त्यांना अन्य कामेही असल्याने कार्यक्रम जाहीर झाला नसल्याने ‘कुंभी’च्या निवडणुकीला मुहूर्त कधी? अशी चर्चा कार्यक्षेत्रात जोरात आहे.