कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तातडीने घ्या : हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2021 11:06 AM2021-11-26T11:06:57+5:302021-11-26T11:09:30+5:30

सांगली, सातारा, कोल्हापूर या तीनही जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाली होती, पण मतदार यादीतील संस्थांच्या सहभागावरून काही सेवा संस्था न्यायालयात गेल्याने कोल्हापूरची निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती.

Election of Kolhapur District Central Co-operative Bank should be held immediately | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तातडीने घ्या : हायकोर्ट

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक तातडीने घ्या : हायकोर्ट

googlenewsNext

कोल्हापूर : निवडणूक कार्यक्रम तातडीने जाहीर करण्याचे आदेश गुरुवारी उच्च न्यायालयाने दिल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. अंतिम मतदार यादीसह सर्व तयारी पूर्ण झाली असल्याने ३५ दिवसांच्या आत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची मर्यादा पाहता २६ डिसेंबरला मतदान होईल अशी चिन्हे आहेत.

सांगली, सातारा, कोल्हापूर या तीनही जिल्हा बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया एकाच वेळी सुरू झाली होती, पण मतदार यादीतील संस्थांच्या सहभागावरून काही सेवा संस्था न्यायालयात गेल्याने कोल्हापूरची निवडणूक प्रक्रिया आहे त्या टप्प्यावर स्थगित करण्यात आली होती. सांगली आणि सातारा जिल्हा बँकेची निवडणूक होऊन निकालही जाहीर झाल्याने कोल्हापूरची कधी होणार याबद्दल विचारणा होत होती.

जिल्हा बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे २०२० मध्ये संपली आहे, पण कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निवडणूक लांबणीवर पडली होती. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने ऑगस्टमध्ये कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह राज्यातील १८ बँकाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. कोल्हापूरची प्रारूप मतदार यादी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होऊन हरकतीनंतर २७ सप्टेंबरला अंतिम मतदार यादीही प्रसिध्द करण्यात आली. फक्त प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याचे बाकी राहिले होते, पण मतदार यादीतील सहभागावरून सेवा संस्थांनी न्यायालयात धाव घेतल्याने कोल्हापूरची निवडणूक प्रक्रिया थांबवण्यात आली. गेला महिना या याचिकांच्या सुनावणीवरच गेला. कधी पटलावर आली नाही तर कांही तांत्रिक बाबी आहे, असे सांगत सुनावणी लांबतच होती, अखेर गुरुवारी ही सुनावणी झाली आणि न्यायालयाने तातडीने निवडणूक जाहीर करा, असे आदेशच काढले. याचिकाकर्ते असलेल्या मडीलगे संस्थेतर्फे जी.एम. नाईक, बँकेतर्फे रवि कदम या वकिलांनी युक्तिवाद केला. न्यायमूर्ती जी.एम. पटेल यांनी निकाल दिला.

निवडणुकीसाठी लागणारी सर्व प्रकारच्या तयारीने सहकार विभाग सज्ज आहे. न्यायालयाच्या निकालाची प्रत हातात पडल्यानंतर लगेचच निवडणूक कार्यक्रम जाहीर केला जाईल.- अरुण काकडे

नेत्यांचा कस लागणार

सध्या जिल्ह्यात विधान परिषदेच्या निवडणुकीचा धूमधडाका अंतिम टप्प्यात असतानाच जिल्हा बँकेचाही निवडणूक कार्यक्रम जाहीर होत असल्याने जिल्ह्यातील राजकारणाची घुसळण आणखी वाढणार आहे. विधान परिषद व जिल्हा बँक यांचे राजकारणात आधीच साटेलोटे आहे. त्यातच पुढे ताेंडावर आलेल्या जिल्हा परिषद निवडणुका पाहता या सर्वांचा एकत्रित विचार करूनच पॅनेलची रचना ठरणार असल्याने नेत्यांचा कस लागणार आहे.

विधान परिषदेनंतर हालचाली वाढणार

महिनाभराचाच कालावधी मिळणार असल्याने रात्र थोडी सोंगे फार अशी परिस्थिती नेत्यांची होणार आहे. आता काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, जनसुराज्य यांची जिल्हा परिषदेवर एकत्रित सत्ता आहे, सतेज पाटील व महादेवराव महाडिक सत्ताधारी गटात आहेत, पण विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा बँकेच्या सत्ताधारी आघाडीतील समीकरणे व नेतेही विस्कटले आहेत. गतवेळी भाजपने एकांगी लढत दिली होती, यावेळी त्यांना बरेच बळ मिळाले असल्याने यावेळची लढत म्हणावी तितकी सोपी नाही. दरम्यान, विधान परिषद निवडणूक लागण्यापूर्वीच बिनविरोधाचे वारे वाहत होते, पण विधान परिषदेमुळे ती मागे पडली असून १४ ला निकाल लागल्यानंतर या हालचाली गतिमान होणार आहेत.

जिल्हा बँकेचे मतदार

गट मतदारसंख्या

विकास सोसायटी १८६६

प्रक्रिया संस्था ४४९

नागरी पतसंस्था, बँका १२२१

पाणीपुरवठा इतर संस्था ४१११

एकूण ७६४७

Web Title: Election of Kolhapur District Central Co-operative Bank should be held immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.