राजलक्ष्मीनगरात पालिका उमेदवार निवडण्यासाठी निवडणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:31 IST2020-12-30T04:31:13+5:302020-12-30T04:31:13+5:30
यंदाच्या कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ७० राजलक्ष्मीनगरची आरक्षित प्रभागापासून सुटका होताच इच्छुक उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी केली. प्रभागाचे आरक्षण ...

राजलक्ष्मीनगरात पालिका उमेदवार निवडण्यासाठी निवडणूक
यंदाच्या कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग ७० राजलक्ष्मीनगरची आरक्षित प्रभागापासून सुटका होताच इच्छुक उमेदवारांनी फटाक्यांची आतषबाजी केली. प्रभागाचे आरक्षण सर्वसाधारण पुरुष जाहीर होताच येथे उमेदवारांची मांदियाळी पाहावयास मिळाली. राजलक्ष्मीनगर प्रभागातील सर्वात जास्त मतदान एकट्या राजलक्ष्मीनगरात आहे. अंदाजे दोन हजार निर्णायक मतदान ज्याच्या पारड्यात पडते, तो उमेदवार विजयी होतो, हे जाहीर आहे. सध्या राजलक्ष्मीनगरातून चारजण इच्छुक आहेत. मग कोणासाठी थांबायचे कोणी, हा प्रतिष्ठेचा प्रश्न.
अखेर राजलक्ष्मी तरुण मंडळ आणि वीर सावरकर विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने एक उमेदवार निवडीसाठी पोटनिवडणूक घेण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार मंगळवार दि. ९ रोजी नामनिर्देशनपत्र भरणे, रविवार दि. ३ रोजी सकाळी आठ ते दुपारी तीन मतदान, तर सायंकाळी निकाल घोषित करून, विजयी उमेदवाराच्या पाठीशी अन्य उमेदवार राहण्याचे ठरविण्यात आले. यासाठी विनापरतावा पंधरा हजार अनामत रक्कम निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी जमा करण्याचे ठरविण्यात आले.
पूर्वी २००५ च्या निवडणुकीत राजलक्ष्मीनगर प्रभाग महिला आरक्षित झाला होता. त्यावेळी प्रा. विजय कुलकर्णी यांनी इच्छुक सहा महिलांतून एक उमेदवार निवडीसाठी निवडणुकीआधी पोटनिवडणूक प्रक्रिया राबवली. ज्यातून मनीषा लाटवडेकर विजयी झाल्या. पुढे मुख्य निवडणुकीत एकी कायम राहिल्याने त्याच निवडून आल्या होत्या. यंदाच्या निवडणुकीत सुद्धा राजलक्ष्मीनगरातील उमेदवार निवडून यावा यासाठी लढविण्यात आलेल्या या पोटनिवडणुकीची चर्चा सोशल मीडियावर व प्रभागात चांगलीच रंगली आहे.