वृद्ध, रुग्णांना भेटला ‘श्रावणबाळ’
By Admin | Updated: September 1, 2014 00:28 IST2014-09-01T00:27:26+5:302014-09-01T00:28:49+5:30
दीपकची मोफत सेवा; आतापर्यंत जवळपास ३०० हून अधिक व्यक्तींना मदत

वृद्ध, रुग्णांना भेटला ‘श्रावणबाळ’
प्रदीप शिंदे - कोल्हापूर --आयुष्यभर कष्ट करून, मुलांच्या शिक्षणासाठी रात्रीचे दिवस केले, त्या आई-वडिलांना आयुष्याच्या शेवटी एकटे राहावे लागते. अनेक मुलांना नोकरी-व्यवसायानिमित्त गाव सोडून बाहेर राहावे लागते. इच्छा असूनही आजारी आई-वडिलांची सेवा करण्यासाठी येता येत नाही, तर काही मुलांना वृद्ध आई-वडीलच नको असतात. अशा वृद्ध व्यक्तींसाठी कोल्हापुरातील दीपक कदमच्या रूपाने आधुनिक काळातील श्रावणबाळच भेटला आहे.
शहरातील अशा वृद्ध व अंथरुणाला खिळलेल्या रुग्ण व्यक्तींच्या घरी दीपक दररोज
सकाळी व सायंकाळी जाऊन त्यांची मोफत सेवा करतो. वृद्ध व्यक्तींना औषधे देणे, कधी तब्येत बिघडल्यास रुग्णालयामध्ये नेणे, स्पंजिग करणे, अंघोळ घालणे, डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्याकडून व्यायाम करून घेणे ही कामे दीपक आनंदाने करीत आहे. कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता गेल्या तीन वर्षांपासून त्याची ही सेवा अविरतपणे सुरू आहे.
नर्सिंगच्या माध्यमातून रुग्णांची सेवा करणाऱ्या आईच्या प्रेरणेने दीपकनेसुद्धा हेच सेवेचे व्रत हाती घेतले आहे. वृद्ध व्यक्तींना,
रुग्णांना अंथरुणातून उठविणे, त्यांना व्यवस्थित बसण्यापासून ते
अंघोळ घालणे, जेवणाची काळजी घेणे या गोष्टी कराव्या
लागतात.
असा आहे दीपक...
देवकर पाणंद परिसरात राहणारा दीपक पदवीचे शिक्षण घेत आहे. त्याने आतापर्यंत जवळपास ३०० हून अधिक रुग्ण व ज्येष्ठ व्यक्तींची सेवा केली आहे. स्वखुशीने कोणी मदत केली तर स्वीकारतो. रुग्ण व वयस्कर व्यक्तींना एकाच छताखाली सेवा देण्यासाठी दीपकने माउली केअर सेंटरची स्थापना केली आहे. या सेंटरच्या माध्यमातून अशा अनेक रुग्णांना सेवा देण्याची त्याची धडपड सुरू आहे.
मला या गोष्टीसाठी संजीव कुलकर्णी आणि अभय कुलकर्णी या दोघांकडून प्रेरणा मिळाली आहे. यासाठी माझ्या आईची मला नेहमी साथ असते. आयुष्यभर मी रुग्ण व वयोवृद्ध व्यक्तींसाठी काम करण्याचे निश्चित केले आहे. - दीपक कदम