वृद्ध आई-वडिलांसाठी मुलगीच बनली श्रावणबाळ
By Admin | Updated: December 19, 2014 00:30 IST2014-12-18T21:59:35+5:302014-12-19T00:30:29+5:30
संसारावर तुळशीपत्र ठेवून सुरू आहे सेवा : समाजातील दानशूरांकडून अश्विनीला हवाय मदतीचा हात

वृद्ध आई-वडिलांसाठी मुलगीच बनली श्रावणबाळ
अनिल पाटील - मुरगूड -‘म्हातारपण नको गा देवा’ असा सूर सर्वत्र पाहावयास मिळतो. कारण उतरत्या वयात वृद्ध पती-पत्नीला एकमेकांचाच आधार बनावा लागतो, तर काहींना वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा लागतो; पण याला अपवाद आहे मुरगूडमधील घटना. लग्न होऊन आपल्या पती, मुलांबरोबर आनंदात राहण्याचे सोडून गेल्या तीन वर्षांपासून अश्विनी आपल्या वृद्ध आई-वडिलांची सेवा-शुश्रूषा करत आहे.
संधिवाताने दोन्हीही पायाने अधू झालेल्या आपल्या आईला स्वत:च्या पायावर उभा करूनच आपल्या संसाराकडे परतणार, या अश्विनीच्या निश्चयामुळे वंशाला दिवाच पाहिजे, अशा मानसिकतेमध्ये अडकलेल्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन आहे. वृद्ध आई-वडिलांची सेवा करून आधुनिक काळातील ‘श्रावणबाळ’ ठरलेल्या अश्विनीला मात्र आईच्या शस्त्रक्रियेसाठी समाजाचे पाठबळ हवे आहे.
कोगनोळी (ता. चिकोडी) येथील आप्पासाहेब कदम हे व्यवसायाने डॉक्टर. अत्यल्प फीमध्ये लोकांवर उपचार करणारे म्हणून त्यांची ओळख. त्यांच्या पत्नी उर्मिला यांना संधिवाताचा त्रास सुरू झाला. अगदी थोडा थोडा वाटणारा त्रास हा पुढे इतका वाढला की, त्यांना चालता, उठता येईना. त्यांना पुण्याच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च झाला. खर्चापोटी कदम यांनी आपली शेती, जमीन आणि घरही विकले. शस्त्रक्रिया झाली; तरीसुद्धा त्रास कमी होण्याऐवजी वाढतच गेला. दैवाला दोष देत कदम कुटुंब मुरगूडमध्ये वास्तव्याला आले. पाच वर्षांपूर्वी दिंगणघाट (ता. वर्धा) येथील सधन कुटुंबातील मुलाबरोबर अश्विनीचे लग्न झाले. अश्विनी आपल्या संसारात सुखी होती; पण तीचे मन मात्र आई -वडिलांकडेच धावत होते. शेवटी ती एक वर्षांच्या छोट्या मुलासह मुरगूडमध्ये दाखल झाली आणि आपल्या आईची सेवा सुरू केली; पण नियतीने पुन्हा एकदा प्रताप दाखवला. वडिलांच्या हृदयामध्ये अडथळा निर्माण झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले.