सैन्य भरतीसाठी आठ हजार उमेदवार
By Admin | Updated: September 1, 2015 23:56 IST2015-09-01T23:56:23+5:302015-09-01T23:56:23+5:30
२७ जागा : शनिवारपर्यंत प्रक्रिया

सैन्य भरतीसाठी आठ हजार उमेदवार
कोल्हापूर : कृषी महाविद्यालय येथे मंगळवारपासून सुरू झालेल्या प्रादेशिक सेना भरतीतील २७ जागांसाठी पहिल्याच दिवशी सुमारे आठ हजार उमेदवारांनी भरती प्रक्रियेत सहभाग घेतला. आज, बुधवारीही भरती प्रक्रियेत उमेदवारांना सहभागी होता येणार आहे. शनिवार (दि. ५) पर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. १०९ इन्फंट्री बटालियन (टी. ए.) मराठा लाईट इन्फंट्री यांच्या वतीने बटालियन परिसर व कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर शिपाई (जनरल ड्यूटी), लिपिक, आदी २७ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. सकाळी सहा वाजलेपासून मैदानावर एकच गर्दी झाली. सकाळी सातनंतर १०९ इन्फंट्री बटालियन (टी. ए.) मराठा लाईफ इन्फंट्रीचे कर्नल अॅलेक्स मोहन यांच्या मार्गदर्शनाखाली भरती प्रक्रियेस सुरुवात झाली. प्रथम उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना एकत्र बसविले. यावेळी ५० जणांचा एक गट करून त्यांची कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर धावण्याची चाचणी घेण्यात आली. आज, बुधवारपर्यंत धावण्याची चाचणी होणार आहे. त्यानंतर शनिवारपर्यंत उंची, वजन, कागदपत्रे तपासणी, आदी प्रक्रिया झाल्यानंतर निवड केली जाणार आहे.
कॅमेऱ्यांची नजर
भरतीची प्रक्रिया सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्यात नोंद करण्यात येत आहे. कृषी महाविद्यालय मैदानाभोवतीही कॅमेरे लावले आहेत. सेनेत पैसे देऊन भरती होता येत नाही. जर कोणी भरतीसाठी पैशांची मागणी केली, तर संबंधित उमेदवारांनी थेट आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन येथील जवान प्रत्येकाला करीत होते. अशी आहेत पदे जनरल ड्यूटीसाठी एकूण जागा २५ असून यासाठी किमान दहावी पास (४५ टक्के गुण आवश्यक), टेक्निकल एज्युकेशन व संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य. लिपिक पदासाठी २ जागा असून किमान बारावी पास, दोन्ही जांगासाठी राज्य व जिल्हा पातळीवरील खेळाडंूना प्राधान्य. टंकलेखन व संगणकाचे ज्ञान असल्यास प्राधान्य.
‘व्हाईट आर्मी’ची मदत
कोल्हापुरात सुरू असलेल्या सैन्यभरतीसाठी आलेल्या एक हजार उमेदवारांना व्हाईट आर्मीतर्फे मोफत जेवण देण्यात आले. सामाजिक बांधीलकी जपत व्हाईट आर्मीतर्फे पुढाकार घेण्यात येत आहे.