आठ महिन्यांत सात बालके झाली ‘नकोशी’

By Admin | Updated: December 10, 2014 00:02 IST2014-12-09T23:58:49+5:302014-12-10T00:02:32+5:30

‘बालकल्याण’मध्ये मायेचे छत्र : कायदेशीर प्रक्रियेनंतर दिले जाते दत्तक

Eight months have passed since 'seven days' | आठ महिन्यांत सात बालके झाली ‘नकोशी’

आठ महिन्यांत सात बालके झाली ‘नकोशी’

इंदुमती गणेश- कोल्हापूर -बालपण हे फुलपाखरासारखं असतं, असं म्हणतात. मन कधी या वेलीवर कधी त्या. पण ते अनुभवण्याआधीच टाकलेपणाचे ओरखडे म्हणजे त्यांच्या भावविश्वाचा विध्वंसच . दुपट्यात लपेटलेले निरागस बाळ जोरजोराने आक्रंदत असते. कधी ते रस्त्यावर टाकलेले असते तर कधी नदीकाठी, कधी रेल्वेस्टेशनवर, तर अगदी कचराकुंडीतसुद्धा. काही धडधाकट तर काही अत्यवस्थ. जिल्ह्यात गेल्या आठ महिन्यांत विविध कारणांमुळे अशी नकोशी झालेली सात नवजात अर्भके येथील बालकल्याण संकुलात दाखल झाली आहेत.
काल शिरोली परिसरात पंचगंगा नदीकाठाजवळ पंचवीस दिवसांचे स्त्री जातीचे नवजात अर्भक पोलिसांना सापडले. सध्या त्याच्यावर सीपीआरमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. कायदेशीर बाबींची पूर्तता होऊन या बाळास बालकल्याण संकुलमध्ये पाठविण्यातयेणार आहे. काही महिन्यांपूर्वी एका प्राध्यापिकेने बाळ रस्त्यावर टाकण्याचा प्रयत्न केला पण हे करताना ती सापडली. कारणमिमांसा झाली तेव्हा बाळाचा बाप त्याची जबाबदारी सांभाळायला तयार नव्हता, असे समजले. अनेक कारणांनी लहान बाळांना रस्त्यात टाकून दिले जाते. पण जर मूल सांभाळणे शक्यच नसेल तर त्याला कुठेही टाकण्यापेक्षा संस्थेकडे रितसर देणे कधीही योग्य. पालक म्हणून आपण कितीही अगतिक असलो तरी शेवटी प्रश्न येतो की या सगळ््यात त्या बाळांचा दोष काय..?
एकदा मूल सापडले की पोलिसांना त्याच्या पालकांना शोधण्यासाठी तीन ते सहा महिन्यांचा कालावधी दिला जातो. यादरम्यान पालकांना चूक उमगली ते परत आलेच तर बाळाला पुन्हा मायेची ऊब मिळते पण असे नाही झाले की मूल बेवारस घोषित केले जाते. त्यानंतर हे मूल अन्य कोणालाही दत्तक देता येते. आता बालकल्याण संकुल किंवा शिशुआधार केंद्र अशा संस्थांमध्ये शून्य ते सहा वर्षे वयोगटांतील बाळांना सांभाळले जाते. त्यामुळे मूल नकोच असेल तर त्यांना कुठेही टाकून देण्यापेक्षा अशा संस्थांमध्ये रितसर दाखल केले पाहिजे.

माताच ठरते दोषी
बेवारस अवस्थेत बाळ सापडले की त्याचे खापर आईवर फोडले जाते. ‘माता न तू वैरीणी’ किंवा ‘दगडाच्या काळजाची’ अशी काही विशेषणे लावली जातात पण मूल ही फक्त आईची नव्हे तर वडिलांचीही जबाबदारी असते. एखादी स्त्री फसवली गेली असेल तर तितकाच दोषी पुरुषही असतो. आधीच फसवणूक, अवहेलना बाळंतपणाच्या कळा झेललेल्या त्या स्त्रीला मूल सोबत घेऊन समाजात जगूच दिले जात नाही. अशावेळी मूल रस्त्यावर टाकताना किंवा संस्थेत सोडताना त्या आईच्या काळजाचे दु:ख कधी समजूनच घेतले जात नाही. पुरुषांना मात्र या सगळ््याच दोषातून मुक्तता. ही विषमताच बालकांच्या या अवस्थेला कारणीभूत ठरते.



जंतूसंसर्ग आणि उपचार
या नवजात बालकांना रस्त्यावर किंवा घाणीच्या ठिकाणी ठेवून गेले की काहीवेळा कुत्रे बाळाचे लचके तोडण्यासही कमी करत नाहीत. काहीवेळा बाळांना जंतुसंसर्ग झालेला असतो, आजारी पडलेली असतात..अशा अवस्थेत बाळ सापडल्यानंतर सीपीआरमध्ये त्याच्यावर उपचार करावे लागतात नंतर हे बाळ बालकल्याण समितीकडे पाठविले जातात. त्यानंतर बाळ आजारी पडले किंवा दुर्धर आजार झाला असेल तर बालकल्याणच्यावतीनेही मोठ्या दवाखान्यांमध्ये बाळांवर उपचार केले जातात. या सगळ््यात या शिशुगृहात बाळांच्या आईचीच भूमिका येथील महिला कर्मचारी आनंदाने पार पाडत असतात. विशेष म्हणजे एवढ्या वर्षात संस्थेत आलेले एकही बाळ दगावलेले नाही..


केवळ अनैतिक संबंधातूनच बाळं टाकली किंवा संस्थेत सोडली जातात हा गैरसमज आहेत. त्यामागे अनेक कारणे आहेत. आमच्या संस्थेत आलेल्या बाळांना लवकरात लवकर मायेचे छत्र मिळावे यासाठी प्रयत्न करतो आणि बाळांना दत्तक देतो. गेल्या दहा वर्षांत आमच्याकडे आलेल्या पंच्याहत्तरपैकी साठ बालकांना आम्ही मायेचे छत्र देऊ शकलो.
- प्रमिला जरग
(संचालिका, शिशु आधार केंद्र)


बालके सोडण्याची कारणे


बालके सोडण्याची कारणे
अनैतिक संबंधातून जन्म
कुमारीमाता
मुलगी झाली म्हणून
आर्थिक अडचणी, दारिद्र्य
बाळाचे अपंगत्व
पालकांना असाध्य आजार
सेक्सवर्करची मुले
अधिक अपत्ये सांभाळण्याची क्षमता नसणे
नातेवाइकांचा आधार नाही

Web Title: Eight months have passed since 'seven days'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.