सुशिक्षितांनी श्रद्धा ठेवावी; पण डोळसपणे

By Admin | Updated: November 30, 2014 23:57 IST2014-11-30T23:20:51+5:302014-11-30T23:57:46+5:30

श्याम मानव : वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे गरजेचे, चमत्काराच्या नावाखाली होते फसवणूक

Educationists should show faith; But blindly | सुशिक्षितांनी श्रद्धा ठेवावी; पण डोळसपणे

सुशिक्षितांनी श्रद्धा ठेवावी; पण डोळसपणे

कोल्हापूर : अध्यात्माचा आणि शब्दप्रामाण्याचा आधार घेऊन विविध बुवा-बाबांकडून सहजपणे लोकांची फसवणूक केली जाते़ विज्ञानाचे नियम ओलांडणारे कोणतेही अध्यात्म नाही़ अध्यात्माच्या नावाखाली सुशिक्षितानांही सहजपणे फसविले जात आहे़ त्यामुळे सुशिक्षितांनी श्रद्धा ठेवावी; पण ती डोळस असली पाहिजे, असे प्रतिपादन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक आणि जादूटोणाविरोधी कायदा जनजागृती प्रचार आणि प्रसार अंमलबजावणी समितीचे राज्यस्तरीय सहअध्यक्ष प्रा़ श्याम मानव यांनी केले़ सामाजिक न्याय पुणे विभागांतर्गत कोल्हापूर जिल्हास्तरीय समितीने आयोजित केलेल्या ‘वैज्ञानिक दृष्टिकोन आणि जादूटोणाविरोधी कायदा चमत्कार’ प्रात्यक्षिकांसह या जाहीर सभेत ते बोलत होते़ महावीर कॉलेज येथील आचार्य विद्यानंद सांस्कृतिक भवनमध्ये आज, रविवारी ही सभा झाली़
प्रा़ मानव म्हणाले, अध्यात्माला विज्ञानाचे कोणतेही नियम लागू नाहीत, हा पूर्वीपासून आपल्यावर होत आलेला संस्कार आहे़ पण जगाची गेल्या दोनशे वर्षांत जी प्रगती झाली आहे, तिचा आधार केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन आहे़ या दोनशे वर्षांत झालेली प्रगती यापूर्वीच्या हजारो वर्षांत झालेली नव्हती़ त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन जपणे गरजेचे आहे़ राज्यातील अनेक भागांत बुवा-बाबा चमत्कारांच्या नावाखाली सुशिक्षितांचीही फसवणूक करत आहेत़ त्यामुळे सुशिक्षितांनी श्रद्धा जरूर बाळगावी, पण आपण ज्यांच्यावर विश्वास दाखवतो, तो पुन:पुन्हा तपासून बघितला पाहिजे़
महाराष्ट्रात सातत्याने नरबळींच्या घटना घडतात याचा संदर्भ देत प्रा़ मानव म्हणाले, अलौकिक शक्ती, गुप्तधन, आणि अपत्यप्राप्ती यासाठी आजही नरबळी देण्याची अघोरी प्रथा घडत आहेत़ अंधश्रद्धा आणि कर्मकांडाचे स्तोम माजले आहे़ या पार्श्वभूमीवर जादूटोणाविरोधी कायद्याची अंमलबजावणी, प्रसार करण्यासाठी समाजातील सर्व स्तरांनी सहभाग घ्यावा़ यावेळी मानव यांनी जादूटोणाविरोधी कायद्याचे वाचन केले तसेच या कायद्याचा भंग केल्यास होणाऱ्या शिक्षा सांगितल्या़
यावेळी प्रा़ मानव यांनी चमत्कारिक बुवा कशा प्रकारे हवेतून चेन, अंगठी काढून दाखवितात, उदबत्तीची दिशा आपल्याला हवी त्याप्रमाणे फिरवून व्यक्तीला संभ्रमात कसे टाकतात, याची प्रात्यक्षिकेही दाखवली़ तसेच बाबांच्या कारनाम्यालासुद्धा वैज्ञानिक आधार असतो हे सिद्ध करणारी विविध प्रात्यक्षिके दाखवली़ यावेळी जिल्ह्णातील विविध सरकारी कर्मचारी, संघटना आणि सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते़
या सभेचे उद्घाटन साहाय्यक समाजकल्याण आयुक्त विजयकुमार गायकवाड यांनी केले़ सुरेश झिरमुरे यांनी कायद्याच्या अंमलबजावणीची गरज मांडली़ यावेळी निवृत्त साहाय्यक समाजकल्याण आयुक्त बाबा पाटील, समन्वय शैला कुरणे आदी उपस्थित होते़. (प्रतिनिधी)

Web Title: Educationists should show faith; But blindly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.