‘मनसे’च्या माजी पदाधिकाऱ्यांना शिक्षा
By Admin | Updated: August 2, 2015 23:55 IST2015-08-02T23:55:27+5:302015-08-02T23:55:27+5:30
पोलिसांवर हल्ला प्रकरण : तीन महिन्यांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड

‘मनसे’च्या माजी पदाधिकाऱ्यांना शिक्षा
मेढा : तपासासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ला करत शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी संदीप सर्जेराव पवार व अश्विन सीताराम गोळे या दोघांना तीन महिने सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास सतरा दिवसांचा कारावास, अशी शिक्षा मेढा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी ठोठावली. घटना घडली त्यावेळी दोघेही ‘मनसे’चे पदाधिकारी होते.
याबाबत माहिती अशी की, सनपाने (ता. जावळी) येथे २०११ मध्ये एका तपास प्रकरणात मेढा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी गेले होते. त्यावेळी या गुन्ह्याबाबत असलेल्या संशयितांना शोधण्यासाठी हे कर्मचारी गावात गेले असता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तत्कालीन तालुकाप्रमुख संदीप पवार (रा. सनपाने) व पदाधिकारी अश्विन गोळे (रा. भोगवली, तर्फ कुडाळ) यांच्यासह चौदा ते पंधरा जणांच्या जमावाने पोलिसांना दमदाटी, धक्काबुक्की करून त्यांच्यावर हल्ला केला.
याप्रकरणी मेढ्याचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक राजेश नाईक यांनी संदीप पवार, अश्विन गोळे याच्यांसह जमावावर भारतीय दंड विधान १४३, १४७, ३५३ अन्वये गुन्हे दाखल केले होते. दंगल करणे, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, या आरोपांखाली तीन महिन्यांचा सश्रम कारावास, पाच हजार रुपये दंड व दंड न भरल्यास
पंधरा दिवसांच्या कारावासाची शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे. दरम्यान, संदीप पवार सध्या शिवसेनेच्या उद्योग सहकार आघाडीचा जिल्हाध्यक्ष आहे. (प्रतिनिधी)