विदेशी भाषांमुळे शिक्षण, करिअरला व्यापक अवकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:24+5:302021-09-21T04:28:24+5:30

कोल्हापूर : जितक्या जास्त भाषा आपण शिकू, तेवढ्या जास्त संस्कृतींची दालने आपल्यासाठी खुली होतात. विदेशी भाषा हा शिक्षण आणि ...

Education due to foreign languages, wide scope for career | विदेशी भाषांमुळे शिक्षण, करिअरला व्यापक अवकाश

विदेशी भाषांमुळे शिक्षण, करिअरला व्यापक अवकाश

कोल्हापूर : जितक्या जास्त भाषा आपण शिकू, तेवढ्या जास्त संस्कृतींची दालने आपल्यासाठी खुली होतात. विदेशी भाषा हा शिक्षण आणि करिअरसाठी एक व्यापक अवकाश आहे, असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले विद्यापीठातील संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. उज्ज्वला बर्वे यांनी सोमवारी केले.

‘विदेशी भाषा: शिक्षण आणि करिअर’ या डॉ. मेघा पानसरे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. सन १९७०मध्ये शिवाजी विद्यापीठामध्ये सुरू झालेल्या तेव्हाच्या ‘रशियन’ व आताच्या विदेशी भाषा विभागाला ऑगस्ट २०२० मध्ये ५० वर्षे पूर्ण झाली. या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठातर्फे या पुस्तकाचे प्रकाशन झाले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी होते.

प्रा. बर्वे म्हणाल्या, परक्या भाषा आपल्याला आपल्या मातृभाषेकडे पाहण्याचा वेगळा दृष्टीकोन देतात. भाषेबरोबरच नवनवी मूल्ये आपल्याला शिकायला मिळतात. तेव्हा त्यातून साहित्य, कला क्षेत्राबरोबरच विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातही करिअरच्या संधींची दालने उघडतात.

प्रा. डॉ. दिलीप चव्हाण म्हणाले, देशात विदेशी भाषा तज्ज्ञ हे सूक्ष्म अल्पसंख्याक आहेत. देशातील शाळा, महाविद्यालये व विद्यापीठांत विदेशी भाषा शिक्षणासंदर्भात लोकशाहीवादी व समन्यायी असे शासकीय धोरण असले पाहिजे.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठ लवकरच ग्रंथ निर्मिती व मोठा भाषांतर प्रकल्प सुरू करणार आहे. भविष्यात विदेशी भाषा जास्तीत शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न होतील.

प्रभारी विभागप्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी प्रास्ताविक केले. शीतल कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी प्र कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील, प्रा. रोहिणी तुकदेव (सांगली), प्रा. रणधीर शिंदे, प्रा. राजेंद्र पारिजात (कोल्हापूर) आदी मान्यवर सहभागी झाले होते. प्रियांका माळकर यांनी आभार मानले.

फोटो : २००९२०२१-कोल- पुस्तक प्रकाशन

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठात सोमवारी विदेशी भाषा : शिक्षण आणि करिअर या डॉ. मेघा पानसरे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचा ऑनलाईन प्रकाशन कार्यक्रम झाला. यावेळी प्रा. डॉ. उज्ज्वला बर्वे यांच्यासह विविध मान्यवर सहभागी झाले होते.

Web Title: Education due to foreign languages, wide scope for career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.