‘शिक्षा’ने केले मुलींच्या छेडछाडवर भाष्य
By Admin | Updated: January 2, 2015 00:19 IST2015-01-01T23:48:34+5:302015-01-02T00:19:28+5:30
इचलकरंजीतील एकांकिका : मुंबई, इस्लामपूर, बीड, पुणे येथील संस्थांचे सादरीकरण

‘शिक्षा’ने केले मुलींच्या छेडछाडवर भाष्य
इचलकरंजी : येथील घोरपडे नाट्यगृहामध्ये सुरू असलेल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेमध्ये बोरीवली-मुंबई, जामगाव, इस्लामपूर, बीड, पुणे, गोवा, नांदेड येथील संस्थांनी एकांकिका सादर केल्या. मनोरंजन मंडळ, मर्दा चॅरिटेबल ट्रस्ट, रोटरी क्लब सेंट्रल व सांस्कृतिक कार्य संचालनालय यांनी ही स्पर्धा आयोजित केली आहे.
बोरिवली-मुंबई येथील रंगरंगत संस्थेने विजय कान्हेरी लिखित व जयप्रकाश भोसले दिग्दर्शित ‘वापर’ ही एकांकिका सादर केली. स्त्रीचा सातत्याने फक्त वापर करण्यात येतो. त्याचदृष्टीने तिच्याकडे पाहिले जाते, असे वास्तव सांगणारी ही एकांकिका होती. जामगाव येथील रंगमुद्रा नाट्यसंस्थेने ‘ओपुनशिया’ ही विनिता पिंपळखरे यांनी लिहिलेली व अर्चना खरपुडे यांनी दिग्दर्शित केलेली एकांकिका सादर केली. अल्लड आणि भोळ्याभाबड्या झोपडपट्टीतील मुलीला युवकांनी दिलेली मानवतेची वागणूक यामध्ये दाखविण्यात आली होती. नांदेड येथील एमजीएम कॉलेजने नाथा चितळे यांनी लिहिलेली आणि सुमती गोखले यांनी दिग्दर्शित केलेली ‘शिक्षा’ ही एकांकिका मुलींच्या छेडछाड प्रकरणावर आधारित होती. यामध्ये योग्य त्या अपराध्याला शिक्षा मिळते का, हा प्रश्न मांडला गेला.
सूर्योदय-इचलकरंजी या संस्थेने ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ ही राजन खान यांची एकांकिका आनंद ढमणगे यांनी दिग्दर्शित केलेली होती. इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या संघाने ‘म्युटेशन’ ही एकांकिका सादर केली. डॉ. भार्गव प्रसाद लिखित आणि राहुल जगताप दिग्दर्शित ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ या जीवन शैलीवर विचार मांडणारी ही एकांकिका होती. गोव्यातील माउली तरुण हौशी नाट्य मंडळ या संस्थेने अभिराम भडकमकर यांनी लिहिलेली आणि नीलेश महाले यांनी दिग्दर्शित केलेली ‘धोबी पछाड’ ही एकांकिका विनोदी शैलीने सादर केली.
सत्यवान व सावित्री या पुराणकथेवर आधारित ही एकांकिका
होती.
बीड येथील नवरंग कला मंडळाची अमर नकाते यांनी लिहिलेली आणि शुभम हावळे यांनी दिग्दर्शित केलेली ‘१४ फेब्रुवारी’ ही विनोदी एकांकिका होती. समर्थ अकॅडमी, पुणे यांनी सादर केलेली ‘ओळखलतं का सर’ ही एकांकिका नाट्य कलाकारांच्या जीवनावर होती.