शिक्षण मंडळ सभापतिपदी ‘शविआ’चे राजू हणबर
By Admin | Updated: October 16, 2015 00:37 IST2015-10-16T00:34:33+5:302015-10-16T00:37:34+5:30
इचलकरंजी नगरपालिका : सुवर्णमहोत्सवी वर्षात पहिल्यांदाच सत्ताबदल

शिक्षण मंडळ सभापतिपदी ‘शविआ’चे राजू हणबर
इचलकरंजी : येथील नगरपालिका शिक्षण मंडळाच्या सभापतिपदाच्या निवडणुकीमध्ये शहर विकास आघाडीने बाजी मारली. सभापतिपदी राजू हणबर यांची बहुमताने निवड करण्यात आली. शिक्षण मंडळाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रथमच सत्ताबदल झाला. मंडळाच्या सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शिक्षण अधिकारी सुभाष चौगुले होते.नगरपालिका शिक्षण मंडळाकडील कॉँग्रेसचे सभापती तौफिक मुजावर यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त असलेल्या सभापतिपदासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी चौगुले यांनी गुरुवारी निवडीची विशेष सभा आयोजित केली होती. अशा सभेच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसच्या सदस्यांत झालेली फूट व गटशिक्षण अधिकाऱ्यांकडून केले जाणारे मतदान यामुळे या सभेविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. शहर विकास आघाडीने त्यांचे असलेले सदस्य पन्हाळा येथे सहलीला गेले होते, तर त्यांच्याबरोबर कॉँग्रेसचे रमेश कांबळे होते.
गुरुवारच्या सभेसाठी शहर विकास आघाडीचे सहा व त्यांच्याबरोबर असलेले कॉँग्रेसचे कांबळे असे सात सदस्य फेटे बांधून सभेला आले. त्यानंतर कॉँग्रेसचे पाच सदस्य सभेमध्ये उपस्थित राहिले. या सभेसाठी गटशिक्षण अधिकारी भास्करराव बाबर हेही उपस्थित होते. शहर विकास आघाडीच्यावतीने राजू हणबर व कॉँग्रेसच्यावतीने अमरजित जाधव यांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यावर झालेल्या मतदानात हणबर यांना आठ, तर जाधव यांना पाच मते मिळाली. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी चौगुले यांनी हणबर सभापती म्हणून विजयी झाल्याचे घोषित केले. शहर विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके वाजवत आनंदोत्सव साजरा केला. (प्रतिनिधी)
चमत्कार घडविण्यात आमदारांना यश--हणबर यांची सभापती म्हणून निवड झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना ‘शविआ’चे पक्षप्रतोद अजित जाधव म्हणाले, ५० वर्षांनंतर कॉँग्रेसकडून सत्ता काढून घेण्यात आमदार सुरेश हाळवणकर यांना यश मिळाले. त्यांनी चमत्कार घडवून आणला. त्यामुळे शिक्षण मंडळात ‘शविआ’ व कारंडे गटाची सत्ता स्थापित झाली. माजी सभापती तौफिक मुजावर म्हणाले, शिक्षण मंडळामध्ये कॉँग्रेस प्रभावीपणे विरोधी पक्षाची भूमिका बजावेल. सत्ताधाऱ्यांना पारदर्शी कामकाज करण्यास आम्ही भाग पाडू.