शिक्षण अन् विकासापासून अजून वंचितच

By Admin | Updated: November 30, 2015 01:06 IST2015-11-30T00:45:52+5:302015-11-30T01:06:33+5:30

समाजाचा आरक्षणासाठी लढा : जिल्ह्यात धनगर समाजाची लोकसंख्या जवळपास ६ लाख--लोकमतसंगे जाणून घेऊ -धनगर समाज

Education and development still deprived from | शिक्षण अन् विकासापासून अजून वंचितच

शिक्षण अन् विकासापासून अजून वंचितच

प्रवीण देसाई -- कोल्हापूर -स्वातंत्र्यानंतर सहा दशके उलटूनही शिक्षण आणि विकासापासून वंचित राहण्याची वेळ धनगर समाजावर आली आहे. डोंगरदऱ्यात राहणाऱ्या या समाजाला पारंपरिक मेंढपाळ व्यवसायातच मर्यादित राहावे लागले आहे. पारंपरिक व्यवसाय सोडून अन्य क्षेत्रांत व शिक्षणामध्ये बोटावर मोजण्याइतकेच प्रमाण दिसत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून समाजाचा आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित आहे. यासाठीही समाजाला लढाई करावी लागत आहे. लढवय्या असलेल्या या समाजाने राष्ट्रकार्यासाठी मराठा साम्राज्यापासून आतापर्यंत अनेक नरवीर दिले आहेत.
जिल्ह्यात धनगर समाजाची लोकसंख्या जवळपास ६ लाखांच्या घरात आहे. पश्चिम भागातील सह्याद्रीलगत असणारे शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, भुदरगड, आजरा, चंदगड या तालुक्यांत डोंगरवस्तीवर राहणारा समाज आजही विकासापासून कोसो मैल दूर असल्याचे चित्र आहे. धनगरवाड्यांवर जायला रस्ता नाही, प्यायला स्वच्छ पाणी नाही, विजेचा तर पत्ताच नाही. शिक्षणाची अवस्था अत्यंत दयनीय आहे. शासनाच्या प्रयत्नाने वाड्या-वस्त्यांवरती वस्ती शाळा निघाल्या तरीही दळणवळणाच्या साधनांअभावी आजही कित्येक शाळा केंबळ्यांच्या झोपडीमध्ये भरत आहेत. माजी राष्ट्रपती दिवंगत ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील महासत्ता देश घडविणारी भावी पिढी याच झोपडीत आपलं भविष्य पाहात आहे. मुख्य गावापासून १० ते १५ किलोमीटर पायपीट करत शिक्षणासाठी जावे लागत आहे. या ठिकाणी शिक्षकांची उपस्थिती ही विचार करायला लावणारी आहे. परिणामी समाजातील भावी पिढीदेखील अंधारात आपले भविष्य शोधत असल्याची स्थिती अनेक ठिकाणी असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर करवीर, कागल, हातकणंगले, शिरोळ, गडहिंग्लज या तालुक्यांतील धनगर समाजाचा प्रमुख व्यवसाय आजही शेळी-मेंढी पालन असल्याने त्यांचीही परिस्थिती फार वेगळी नाही. शिक्षण, रस्ते, वीज आणि पाण्याची जरी सोय असली तरी पोटाची खळगी भरण्यासाठी हा समाज आजही मेंढरांमागे भटकंती करतो आहे. परिणामी भावी पिढी शिक्षणापासून दूर आहे. अनेक वर्षे या समाजासाठी असलेल्या अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढी महामंडळाकडे निधि उपलब्ध नाही. शासनाचे कोणतेही पाठबळ नाही. रात्री अपरात्री मेंढरांवर पडणारे दरोडे, तसेच मेंढरांकडे असणाऱ्या महिलांवर होणारे अतिप्रसंग व खुनासारखे होणारे गंभीर प्रसंग आजही या समाजाच्या नशिबी असल्याचे चित्र आहे. परिणामी, हा व्यवसाय अनेक समाजबांधवांनी सोडून देत वेठबिगारीची व हमालीचे काम स्वीकारत आपला उदरनिर्वाह सुरू ठेवला आहे.
धनगर समाज हा जिल्ह्यात सर्वत्र आढळतोे. त्यांचा पारंपरिक शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय आहे; परंतु शासनाची उदासीनता, चराऊ कुरणाचा प्रश्न व स्थानिक शेतकऱ्यांची अरेरावी आदी कारणांमुळे प्रचंड नफा देणारा हा व्यवसाय समाजातील बहुतांश जणांनी सोडून दिला आहे. उदरनिर्वाहासाठी हा समाज शहराच्या दिशेने वळला आहे. मार्केट यार्ड, रेल्वे स्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक येथे हमाली करून शहरासह उपनगरांमध्ये हा समाज स्थिरावला आहे.
कोल्हापूर जिल्हा हा लोकराजा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या देशात सर्वप्रथम आरक्षणाची घोषणा करणारे शाहू महाराज हे पहिले राजे होते. त्यांनी कोल्हापूर संस्थानात सर्व जाती-धर्माच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी सर्व समाजाची वसतिगृहे बांधली; परंतु हा समाज शिक्षणापासून दूर असेल म्हणून पण या समाजाचे वसतिगृह झाले नाही. या बाबीची समाजातील विद्यार्थ्यांमध्ये खंत आहे. या समाजाचे आजतागायत वसतिगृह अथवा समाजाची अशी इमारत बांधण्यात आलेली नाही. या समाजातील हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच प्रमाण शिक्षित झाले आहे. प्राध्यापक, वकील, डॉक्टर यासह विविध क्षेत्रांतही त्यांनी झेप घेतली आहे; परंतु हा शिकलेला समाज संघटित नसल्याने त्याचा उर्वरित समाजाला म्हणावा असा उपयोग होताना दिसत नाही.
एकेकाळी या देशावरती राज्यकर्ती असणारी ही जमात सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, मराठा साम्राज्याचे सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महाराज यशवंतराव होळकर आदींचे वंशज असणारी ही जमात काळाच्या ओघात इतकी मागास का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. यामागील प्रमुख कारण म्हणजे धनगर समाजाला आदिवासी आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही. यासाठी समाजाच्या संघटना सातत्याने आंदोलन करत आहेत. या सरकारकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत परंतु त्यांनीही जर हा प्रश्न मार्गी लावला नाही तर पुन्हा रस्त्यावरची लढाई करण्याची तयारीही या लढावू समाजाची आहे.

Web Title: Education and development still deprived from

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.