कोल्हापूर : रेकॉर्ड ब्रेक दरवाढीनंतर खाद्यतेलाचे दर आता उतरणीला लागले आहेत. किलोमागे १२ ते १५ रुपयांनी घट झाल्याने तब्बल चार महिन्यांनंतर ग्राहकांना थोडाफार दिलासा मिळाला आहे. पण दर हजाराने वाढत गेले आणि उतरताना मात्र १५ किलोंच्या डब्यामागे अवघे दीडशे ते दोनशे कमी झाल्याने अजूनही किचन बजेट आवाक्याच्या बाहेरच आहे.
कोरोना, लॉकडाऊन आणि पाठोपाठ नैसर्गिक संकटामुळे जगभरात तेलबियांच्या उत्पादन व वितरणावर फार मोठा परिणाम झाला. परिणामी दिवाळी झाल्यापासून हळूहळू तेलाचे दर वाढू लागले. नवीन वर्ष सुरू झाले आणि कोरोना संसर्गाचा वेग वाढू लागला, तसा दर वेगाने वाढू लागले. मार्च एप्रिलमध्ये तर सर्वच तेलांच्या डब्याचे दर २ हजारांच्यावर गेले. जो डबा १२०० ते १५०० रुपयांना येत होता, तो एकदम १९००, २००० असे करत २४०० ते २६०० वर गेला. लॉकडाऊन काळात आधीच रोजगार हिरावलेला, उत्पन्न घटलेले, त्यात तेलाचे दर दीड ते दुपटीने वाढल्याने खाद्यतेलाची फोडणी टाकताना गृहिणींना दहावेळा विचार करावा लागला. आधीच महागाईने डोके वर काढले असताना त्यात तेलाने भर टाकल्याने किचन बजेट बिघडून गेले.
ही दरवाढ सुरू असताना आयातीवरचे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमती हळूहळू उतरणीला लागल्या आहेत. त्यातच उन्हाळी हंगाम तेलबियांचे उत्पादनही चांगले झाले आहे. जगभरातही उत्पादन चांगले झाल्याने तेलाचे उत्पादनही वाढले आहे. या सर्वांमुळे का असेना; पण ग्राहकांना मात्र या लॉकडाऊन काळात मोठा दिलासा मिळाला आहे.
१) खाद्य तेलाचे दर (प्रती किलो)
आधीचे आताचे
सोयाबीन १६८ १५६
सरकी १६८ १५६
शेंगदाणा १९८ १८६
पाम १६० १४६
चौकट
तेलबियांचे उत्पादन खाण्यापुरतेच
तेलाच्या डब्याची किंमत अडीच हजारांवर गेल्याने उसाच्या एका टनाच्या किमतीत १५ किलोंचे खाद्यतेल खरेदी करण्याची वेळ शेतकऱ्यांवरही आली. मुळातच जिल्ह्यात तेलबियांचे उत्पादन जास्त प्रमाणात होत नाही. सोयाबीन व सूर्यफुलाचे पीक घेतले जाते, पण त्याचे तेल घरगुती पातळीवर काढले जात नाही. ते नगदी पिकांप्रमाणेच व्यापाऱ्यांना विकले जाते. शेंगदाण्याचे उत्पादनही खाण्यापुरतेच घेतले जाते. ऑईल मिल अथवा घाण्यावर जाऊन तेल काढून आणणे खर्चीक असल्याने शेतकरी त्याच्या नादाला फारसे लागत नाहीत.
प्रतिक्रिया
आंतरराष्ट्रीय बाजारातील घसरणीमुळे देशांतर्गत खाद्यतेलाचे दरही किलोमागे १२ ते १५ रुपयांनी कमी झाले आहेत. पण ही घसरण तात्पुरती स्वरूपाची दिसत असून पुढील महिन्यापासून पुन्हा दर वाढीस लागण्याची चिन्हे दिसत आहेत.
संदीप अथणे, खाद्यतेल घाऊक व्यापारी
खाद्यतेल महागल्याने गेल्या चार महिन्यांपासून स्वयंपाकघरात तेल वापरताना हात आखडता घेतला होता. आता दर कमी झाल्याचा आनंद आहे, पण वाढलेल्या दराच्या तुलनेत कमी झालेले दराचे प्रमाण खूपच कमी आहेत. अजून दर कमी व्हायला हवेत.
अश्विनी पाटील, वंदूर. ता. कागल