पर्वताचा कडा कोसळला... आणि काळजाचा ठोका चुकला!

By Admin | Updated: May 4, 2015 00:35 IST2015-05-04T00:31:01+5:302015-05-04T00:35:10+5:30

नेपाळमधील थरकाप : गिर्यारोहणासाठी गेलेले सांगलीचे चौघे सुखरूप परतले

The edge of the mountain collapses ... and the pain has gone wrong! | पर्वताचा कडा कोसळला... आणि काळजाचा ठोका चुकला!

पर्वताचा कडा कोसळला... आणि काळजाचा ठोका चुकला!

अंजर अथणीकर / सांगली
गिर्यारोहणाचा आनंद घेत असतानाच अचानक पर्वत हलू लागला... काही कळायच्या आत एक मोठा बर्फाचा कडा विजेच्या कडकडाटासारखा आवाज करीत कोसळला आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला... गाईडनेच भूकंप झाल्याचे सांगितले आणि आम्ही सर्वांनी जीव मुठीत धरून परतीचा मार्ग धरला... असे अनुभव शनिवारी दुपारी नेपाळहून सांगलीला परतलेले डॉ. सचिन उदगावे यांनी सांगितले.
१५ एप्रिलरोजी सांगलीहून डॉ. उदगावे, अमोल पाटील, स्वप्नील कुंभार व त्यांच्या पत्नी मानसी कुंभार हे चौघे एव्हरेस्टवर ट्रेकिंगसाठी गेले होते. एव्हरेस्टच्या दुसऱ्या कॅम्पवर आरोग्य बिघडल्याने कुंभार दाम्पत्य मागे परतले. अमोल पाटील आणखी दोन कॅम्पवरून श्वासोच्छवासाचा त्रास होऊ लागल्याने तेही लोबोची येथील एका हॉटेलमध्ये उतरले. डॉ. उदगावे मात्र एव्हरेस्टच्या कॅम्पपर्यंत गेले. मित्र आजारी असल्यामुळे त्यांनी परतीचा मार्ग वेगाने सुरु केला. चार तासाचे अंतर केवळ दीड तासात पार करून तुघला येथे ते आले.
त्यानंतरचा अनुभव सांगताना डॉ. उदगावे म्हणाले की, येथे जगातील सर्वाच उंच स्मशानभूमी आहे. एव्हरेस्ट चढताना मृत्युमुखी पडलेल्यांना येथे पुरले जाते. याठिकाणी आलो असताना ७.६ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. मला वाटले, मला चक्कर येत आहे. त्यानंतर जोरदार आवाज होऊन आम्ही चार तासापूर्वी सोडलेल्या कॅम्पवर बर्फाचा कडा कोसळला. भराभर चालत आल्यानेच मी आणि माझे सहकारी वाचलो, अन्यथा आमचे मृतदेहही सापडले नसते. देवाचे आभार मानून आम्ही परत फिरलो. मित्रांची काळजी वाटू लागली. अमोल पाटील हे ज्या हॉटेलमधून पाच तासांपूर्वी जेवण करून बाहेर पडले होते, ते हॉटेल पूर्णपणे जमीनदोस्त झाले होते. शेवटी त्याच्याशी व्हॉटस् अ‍ॅपवरून संपर्क झाल्याने खूप मोठा दिलासा मिळाला. दुसऱ्या दिवसाचा भूकंप मात्र पूर्वकल्पना देऊन झाला होता. यावेळी आम्ही मोकळ्या मैदानात होतो.
आमच्या ‘त्या’ चार दिवसात जवळपास शंभरहून अधिक भूकंप झाले. आम्ही चौघेही लोबोची येथे भेटलो. त्यानंतर परतण्यासाठी खूपच त्रास झाला. तरीही भूकंपाच्या इतक्या मोठ्या संकटातून सर्वांचे प्राण वाचल्याचे मोठे समाधान होते. त्यामुळे हे अनुभव घेऊन आम्ही सांगलीला परतलो.
चार तासांपूर्वी सोडलेले हॉटेल कोसळले
एव्हरेस्टवर गिर्यारोहणासाठी सांगलीचे अमोल पाटील सहकाऱ्यांसमवेत गेले होते. श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ते एव्हरेस्टची मोहीम मध्येच सोडून परतले. परतीच्यावेळी रात्र झाल्याने त्यांनी फेरीच्या गावातील ‘हिमालयीन’ या हॉटेलमध्ये मुक्काम केला. सकाळी उठून त्यांनी परतीचा प्रवास सुरू केला. सकाळी अकराच्या सुमारास भूकंप झाला आणि चार तासांपूर्वी सोडलेले हिमालयीन हॉटेल पूर्णपणे भुईसपाट झाले. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झाली नसली तरी, दहा ते बाराजण गंभीर जखमी झाले. डॉ. उदगावे या ठिकाणी पोहोचले. याच ठिकाणी त्यांना अमोल पाटील येथून निघून गेल्याचे कळाले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Web Title: The edge of the mountain collapses ... and the pain has gone wrong!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.