पर्यावरणपूरक पाऊल; प्रशासनाची पाठ

By Admin | Updated: September 5, 2014 23:59 IST2014-09-05T23:50:41+5:302014-09-05T23:59:10+5:30

कोल्हापूरवासीयांचा पुढाकार : सक्षम यंत्रणा उभी करण्यात महापालिका अपयशी

Eco-friendly steps; Administration text | पर्यावरणपूरक पाऊल; प्रशासनाची पाठ

पर्यावरणपूरक पाऊल; प्रशासनाची पाठ

इंदुमती गणेश- कोल्हापूर --पाण्यात विसर्जित होणाऱ्या मूर्तींचा अवमान आणि जलप्रदूषणाचे गांभीर्य समजून कर्तव्यदक्ष नागरिकांची भूमिका बजावत कोल्हापूरकरांनी काल, गुरुवारी गणेशमूर्तींचे दान करून पर्यावरणपूरक पाऊल उचलले. मात्र, त्यांच्या या पुढाकाराला साथ देण्यात महापालिका प्रशासनाने प्रचंड दिरंगाई दाखविली. मूर्ती विसर्जनासाठी सक्षम पर्यायी यंत्रणा उभारली गेली असती, तर जलाशयात एकही गणेशमूर्ती विसर्जित झाली नसती. या उपक्रमात सातत्य ठेवण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देणे ही महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची जबाबदारी असणार आहे.
काल, गुरुवारी मोठ्या उत्साहात घरगुती गौरी-गणपतींचे विसर्जन झाले. पंचगंगा नदीघाट, रंकाळा, राजाराम तलाव, राजाराम बंधारा, कोटितीर्थ, आदी ठिकाणी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे गणेशमूर्ती दान केल्या. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला नागरिकांचा प्रतिसाद; पण प्रशासनाची पाठ, असेच एकूण चित्र होते. काही अतिउत्साही नागरिक निर्माल्य प्लास्टिकच्या पिशव्यांसोबतच पंचगंगा नदीपात्रात टाकत होते. शिवाय मूर्ती विसर्जित करण्याचेही प्रमाण बऱ्यापैकी होते. पंचगंगा विहार मंडळाचे कार्यकर्तेच काहिलीतून मूर्ती नदीच्या मध्यभागी विसर्जित करीत होते. या सगळ्या गोष्टींपासून नागरिकांना परावृत्त करण्यासाठी माईकवरून सूचना देणारी यंत्रणा नव्हती. एकही अधिकारी किंवा कर्मचारी नदीघाटावर उपस्थित नव्हते. तेथे निर्माल्य टाकण्यासाठी कुंड नव्हते. काहिलींची संख्याही कमी होती.शहरातील भागाभागांत ठेवण्यात आलेल्या काहिली, शाळा, रोटरी क्लब, दीपक पोलादे, विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी, पर्यावरणप्रेमी, अशा विविध व्यक्ती व संस्थांच्या मदतीमुळे आणि जनजागृतीमुळे हा उपक्रम यशस्वी झाला.

विसर्जन कुंड राहिला विचाराधीन...
गणेशोत्सवाच्या या उपक्रमात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा अजिबात सहभाग नव्हता. काही दिवसांपूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळाने काही उद्योजकांच्या सहभागाने कृत्रिम विसर्जन कुंड बांधण्याचा प्रस्ताव महापालिकेपुढे ठेवला होता. महापालिकेने फक्त जागा द्यायची, तेथे विसर्जन कुंड बांधण्यासाठी येणारा सगळा खर्च उद्योजकांमार्फत केला जाईल, अशी ती कल्पना होती. त्यावर महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी आम्ही एस्टिमेट काढतो, जागा ठरवतो, असे सांगून वेळकाढूपणा केला. त्यामुळे ही योजना बारगळली.
आता जबाबदारी सार्वजनिक मंडळांचीही...
घरगुती गणेश मूर्तिदानचे सार्वजनिक मंडळांनीही अनुकरण करणे गरजेचे आहे. इराणी खणीची क्षमता संपल्याने तेथे मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करणे आता शक्य नाही हे वास्तव आहे. त्यामुळे आता मंडळांनीही मूर्तिदान किंवा कायमस्वरूपी एकच मूर्ती बसविण्यास सुरुवात करायला हवी. शाहूनगर मित्रमंडळ, लेटेस्ट तरुण मंडळ यांचा आदर्श घेत विसर्जित मूर्तींची संख्या कमी करण्यावर भर देणे ही काळाचीच नव्हे, तर सर्वच जलाशयांच्या रक्षणाचाही गरज बनली आहे.

शहरातील मुख्य जलाशयांच्या ठिकाणीच नागरिकांची प्रचंड गर्दी होते आणि इच्छा असूनही अनेकजण मूर्तिदान करण्याऐवजी विसर्जित करतात. त्यामुळे या विसर्जन स्थळांचे विकेंद्रीकरण झाल्यास प्रशासनावरचा ताण कमी होईल. त्या-त्या भागांतील नगरसेवकांनी पुढाकार घेऊन विसर्जनाची सोय करून दिली पाहिजे.
- प्रा. विकास जाधव
(सहायक प्राध्यापक, पर्यावरणशास्त्र
विभाग, शिवाजी विद्यापीठ.)


या मूर्तिदान उपक्रमात सातत्य ठेवायचे असेल, तर महापालिकेने सूक्ष्म नियोजन करणे गरजेचे आहे. पुढच्यावर्षीच्या गणेशोत्सवाच्या आधीच तीन-चार महिने प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली पाहिजे. शाडूच्या मूर्तींची माती पुन्हा कुंभाराला देणे, न रंगवलेली मूर्ती प्रतिष्ठापित करणे, हानिकारक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर अशा गोष्टींतूनही जलाशयांचे प्रदूषण थांबेल. - अनिल चौगुले (निसर्गमित्र)

विसर्जन कुंडाचाही पर्याय अधिकाऱ्यांमुळे बारगळला याबद्दल सर्व पर्यावरणप्रेमी संघटना त्यांचा निषेधच करणार आहेत. आता मंडळांनीही या उपक्रमात योगदान देण्याची गरज आहे.
- उदय गायकवाड (पर्यावरणतज्ज्ञ)

Web Title: Eco-friendly steps; Administration text

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.