आळवेचा पर्यावरणपूरक मातीचा गणपती
By Admin | Updated: September 4, 2014 00:05 IST2014-09-04T00:05:02+5:302014-09-04T00:05:12+5:30
शंभर वर्षांची परंपरा : गौरी-शंकराच्या मुखवट्यांसाठी अळूच्या पानांचा वापर

आळवेचा पर्यावरणपूरक मातीचा गणपती
किरण मस्कर- क ोतोली --कासारी नदीच्या काठावरील दोनशे उंबऱ्याचे आळवे (ता. पन्हाळा) गाव. या गावाने आजच्या झगमगटाच्या गणेशोत्सवात आपली पर्र्यावरणपूरक गणेशोत्सवाची १०० वर्षांची परंपरा जपली आहे. गावातील प्रत्येक घरात तसेच सर्व ११ तरुण मंडळे गेली १०० वर्षे केवळ मातीच्या (कोणत्याही रंग व शाडू किंवा प्लास्टर विरहित) मूर्तीची प्रतिष्ठापना करत आहेत.
गणेशोत्सवाचे धार्मिक महत्त्व अनन्यसाधारण असले तरी सध्या गणेशमूर्ती तयार करण्यासाठी वापरले जाणारे प्लास्टर, केमिकल्सयुक्त रंग तसेच निर्माल्य यामुळे प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटनासह प्रशासनानेही याकडे लक्ष वेधत जनजागृतीसाठी कंबर कसली आहे. मात्र, आळवे गाव मात्र या साऱ्या प्रदूषणापासून कोसो दूर आहे. कारण येथील गणेशमूर्ती पूर्णपणे प्रदूषणविरहित आहेत. येथील कुंभार समाज गेली शंभर वर्षे गावातीलच मातीपासून एक फुटापासून ते पाच ते सात फुटांपर्यंत गणेशमूर्ती तयार करतात. प्रत्येक घरात तसेच गावातील ११ तरुण मंडळांत या मूर्तींची मोठ्या भक्तीभावाने व धुमधडाक्यात प्रतिष्ठापना केली जाते.
फक्त मातीपासून तयार केलेल्या या मूर्तीमुळे गाव प्रदूषणमुक्त राहते. तसेच गौरी-शंकराचेही मुखवटे कुठेही गावात पाहावयास मिळत नाहीत. मुखवट्यांऐवजी अळूचे पान बांधून त्यावर पांढऱ्या रंगाने चेहऱ्याचे रूप दिले जाते व गौराई-शंकराचे पूजन केले जाते. या मातीच्या गणपतीच्या आदर्शवत परंपरेमुळे आळवे गाव गेली कित्येक वर्षे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करत आहे.