खा की खा !

By Admin | Updated: May 11, 2017 00:52 IST2017-05-11T00:52:11+5:302017-05-11T00:52:53+5:30

समाजभान

Eat that | खा की खा !

खा की खा !

परवा एका वृत्तवाहिनीवर नको असलेले अर्थात आरोग्यास हानिकारक पदार्थ खाल्ले की काय होते, हे सांगणारे एक वृत्त दाखविण्यात येत होते. ते होते एका माणसाळलेल्या वानराचे. पर्यटकांनी दिलेले खाद्यपदार्थ, शीतपेये ते आवडीने खात होते. शीतपेयाची बाटली माणसाप्रमाणे तोंडाला लावून पित होते. हे सर्व बघत असतानाच एका गोष्टीकडे लक्ष जात होते ते म्हणजे त्याचे पोट. कोणत्याही वानराचे पोट सुटलेले आपण पाहिले आहे का? तर याचे उत्तर नाही असेच येते; पण या वानराचे पोट माणसाप्रमाणे सुटलेले होते. यामुळे सर्वसामान्य वानराप्रमाणे उड्या मारणे तर दूरच त्याला चालणे मुश्कील बनल्याचे दिसत होते. म्हणजेच निसर्गाने जो आहार, विहार सांगितला आहे तो डावलून भलतेच खाणे-पिणे चालू केले की काय होते, याचे हे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. मनुष्य असो की एखादा अन्य प्राणी सर्वांनाच हे तत्त्व लागू पडते. हे सर्व आता आठवायचे करण म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या उपहारगृहांमध्ये जंक फूड विक्रीवर बंदी घातली आहे. शालेय मुलांच्या आरोग्यावर जंक फूडचा होणारा अनिष्ठ परिणाम टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या उपहारगृहात कोणते पदार्थ विकता येतील आणि कोणते येणार नाहीत याची यादीही या आदेशात देण्यात आली आहे. या निर्णयामुळे केवळ शाळांच्या उपहारगृहामध्ये मिळणारे जंक फूड बंद झाले. बाहेर ते मिळणारच आहे. शिवाय केवळ विद्यार्थीच काय, अख्खी तरुणाई जंक फूडच्या मागे लागली आहे. तिचे काय करणार? आजारी पडल्यानंतर डॉक्टरकडे गेले की त्यांचा पहिला प्रश्न असतो काय वेगळे खाल्ले आहे का? बाहेर कुठे खाल्लंय का? हो, असे उत्तर दिले की असे पदार्थ खात जाऊ नका किंवा कमी खा, असा सल्ला दिला जातो. शिवाय कोणत्याही आरोग्य शिबिरात अथवा डॉक्टरांच्या व्याख्यानात जंक फूड अथवा फास्ट फूड खाऊ नका. अगदीच खायचे झाले तर कमी खा, असे सांगितले जाते; पण लक्षात कोण घेतो?
वडा पाव, भजी, पिझ्झा, बर्गर, समोसा, फ्रेंच फ्राइज, रोल्स आणि रॅप्स, चिप्स, नुडल्स, टिक्का, पाणीपुरी, सर्व प्रकारचे चॉकलेट, केक, बिस्किटस, पेस्ट्री, जाम, जेली, गुलाबजाम, पेढा, कलाकंद आदींचा समावेश जंक फूडमध्ये होतो. यातील कोणताही पदार्थ समोर आला की तोंडाला पाणी सुटतेच; पण याचे घातक परिणाम पाहावयाचे झाले तर यामुळे मधुमेह, रक्तातील साखर कमी जास्त होणे, लठ्ठपणा वाढणे, पचनाचे विकार, बद्धकोष्ठता, थकवा , दुबळेपणा, नैराश्य, ह्््दयरोग, मेंदूचे विकार, किडनीचे विकार जडू शकतात. मुळात ‘जंक’ या शब्दाचा अर्थच निरुपयोगी किंवा भंगार असा आहे. या निरुपयोगी पदार्थांचेच आपल्याला जादा आकर्षण आहे. रस्त्या-रस्त्यावर अशा पदार्थांचे स्टॉल्स्, हॉटेल्स् किंवा दुकाने आहेत. या जंक फूडमुळे हजारो लोकांना रोजगार मिळाला असला, उलाढाल कोट्यवधींची होत असली तरी मानवी शरीरावर त्याचे होणारे परिणाम पाहता केवळ शाळांमधील उपहारगृहामध्ये विक्रीला बंदी न घालता त्यांच्या उत्पादनावरच मर्यादा आणायला हवी किंवा त्यांवर दारू, सिगारेटप्रमाणे मोठ्या प्रमाणात ऐशारामी कर लावायला हवा. त्याचबरोबर काय खावे काय नको, याबाबत मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन मोहीम हाती घ्यायला हवी. कोल्हापुरातील शिवाजी मराठा हायस्कूलचे शिक्षक आणि चिल्लर पार्टी चळवळीचे मिलिंद यादव हे चळवळीच्या कोणत्याही कार्यक्रमात सुरुवातीला जंक फूडचे दुष्परिणाम सांगून मुलांना घरी बनविलेले पदार्थच खा, असे सांगत असतात. वैयक्तिक पातळीवर काहीजण अशी मोहीम राबवित असले तरी समाजानेही त्याला साथ द्यायला हवी. शासनानेही याबाबत योग्य ती पावले उचलायला हवीत, तरच आपले पर्यायाने समाजाचे आरोग्य चांगले राहील.
- चंद्रकांत कित्तुरे    kollokmatpratisad@gmail.com



 

Web Title: Eat that

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.