ई-कचऱ्याबाबत जागरुकता गरजेची

By Admin | Updated: January 14, 2016 00:21 IST2016-01-14T00:21:33+5:302016-01-14T00:21:33+5:30

अश्विनी रामाणे : रोटरी क्लब आॅफ करवीर व चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन अभियान’

E-waste needs awareness | ई-कचऱ्याबाबत जागरुकता गरजेची

ई-कचऱ्याबाबत जागरुकता गरजेची

कोल्हापूर : आधुनिक जीवनशैलीमुळे सर्वत्र इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि उपकरणांचा वापर वाढला आहे; पण त्या खराब झाल्यानंतर आपण सर्वजण नेहमीच्या ओल्या कचऱ्यामध्ये इलेक्ट्रॉनिक कचरा टाकून देतो. त्यामुळे मानवी शरीरारवर विपरीत परिणाम होतो. हे टाळण्यासाठी सर्व समाजाने ई-कचऱ्याबाबत स्वयंस्फूर्तीने जागरूक व्हावे, असे प्रतिपादन महापौर अश्विनी रामाणे यांनी केले.
रोटरी क्लब आॅफ करवीर चॅरिटेबल ट्रस्टतर्फे बुधवारी सकाळी संत गाडगेबाबा पुतळा, जोतिबा रोड येथे आयोजित ‘इलेक्ट्रॉनिक कचरा संकलन अभियान’च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे मुख्य अधिकारी एन. एच. शिवांगे होते.
रामाणे म्हणाल्या, आधुनिक जीवनशैलीमुळे सगळीकडे इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती व खरेदी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. काही कालावधीनंतर या वस्तू खराब होतात. मग आपण सर्वजण हा कचरा नेहमीच्या कचऱ्यामध्ये टाकून देतो. या वस्तूंचे कचऱ्यात विघटन होत नसल्याने त्याचा मानवी शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. हे टाळण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांसह पालकांनी या ई-कचरा संकलन अभियानात सहभागी होऊन शहराला प्रदूषणमुक्त करावे. रोटरी क्लब आॅफ करवीरचा हा उपक्रम स्तुत्य आहे.
प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे मुख्य अधिकारी एन. एच. शिवांगे म्हणाले, मोबाईल, टी.व्ही., विविध घरगुती वापरांकरिता लागणारी इलेक्ट्रॉनिक यंत्रे आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनली आहेत. पण, ती खराब झाल्यावर त्याची योग्य विल्हेवाट लावणे अवघड होते. हा ई-कचरा नेहमीच्या कचऱ्यात सहज मिसळत नाही. त्याचे विघटन होत नाही. म्हणून हा ई-कचरा नेहमीप्रमाणे कचऱ्यात न टाकता तो पुरून नष्ट करावा. त्यामुळे प्रदूषण होणार नाही. रोटरी क्लब आॅफ करवीर चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम सर्वांसाठी मार्गदर्शक असा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांकडे अशा कचऱ्याचे संकलन करण्यासाठी आग्रह धरला पाहिजे. ई-कचरा अभियान अध्यक्ष एस. एन. पाटील यांनी संकल्पना स्पष्ट केली.
यावेळी उपमहापौर शमा मुल्ला, प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी जयंत कदम, रोटरी क्लब आॅफ करवीरचे निशिकांत नलवडे, शंकर शिंदे, हरिश पटेल, मच्छिंद्र चौगुले, प्रमोद चौगुले, मुख्याध्यापिका प्रेरणा जाधव यांच्यासह इंदुमती गर्ल्स हायस्कूल व इंदिरा गांधी विद्यानिकेतनच्या विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Web Title: E-waste needs awareness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.