कागलमधील शाळांना ई-लर्निंगची सुविधा

By Admin | Updated: August 26, 2015 21:43 IST2015-08-26T21:43:38+5:302015-08-26T21:43:38+5:30

इंडो-काऊंट कंपनीचा उपक्रम : नगरपालिकेच्या सात शाळांत प्रारंभ

E-learning facility in schools in Kagal | कागलमधील शाळांना ई-लर्निंगची सुविधा

कागलमधील शाळांना ई-लर्निंगची सुविधा

कागल : गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील प्रसिद्ध अशा इंडो-कांऊट या कंपनीने या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण देण्याचा विडा उचलत नगरपालिकेच्या सर्व शाळांत‘ई-लर्निंग’ची सुविधा सुरूकेली आहे. कागल तालुक्यातील ४० सरकारी शाळांना या सुविधा देण्याचा मानस आहे. नगरपालिकेच्या सात शाळांमध्ये प्रत्यक्षात ई-लर्निंग शिक्षण सुरूझाले आहे.इंडो - काऊंट इंडस्ट्रीज लिमिटेड ही धागा आणि कापड उत्पादन करणारी कंपनी आहे. गोकुळ शिरगाव आणि कागल पंचतारांकित वसाहतीत हे प्रकल्प सुरू आहेत. कंपनीने उत्पादित केलेल्या उत्पादनांना जगभर मागणी आहे. जगातील पहिल्या दहांमध्ये ही कंपनी आहे. या कंपनीचे अध्यक्ष अनिलकुमार जैन यांनी इंडो -काऊंट फौंडेशनची स्थापना केली आहे. याद्वारे ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून पहिल्या टप्प्यात कागल तालुक्यातील ४० शाळा निवडल्या आहेत. शहरातील नगरपरिषदेच्या सात शाळांना ही ‘ई-लर्निंग’ची सुविधा प्रदान केली आहे. ६७८ चा पडदा, प्रोजेक्टर, बॅटरी बॅकअप, इन्व्हर्टर आणि अभ्यासक्रम अशा जवळपास २५ हजार रुपये किमतीचे साहित्य, शुद्ध पाणी मिळणारे अ‍ॅक्वागार्ड १५००० रुपयांचा आणि २५0 रुपयांची स्कूल बॅग प्रत्येक विद्यार्थ्याला यांचा यात समावेश आहे.
ई- लर्निंग अभ्यासक्रम ओकार्ड फौंडेशन, मुंबई यांनी तयार केला आहे. मराठी बरोबरच इंग्रजी आणि उर्दू भाषेतही हा अभ्यासक्रम बनविला आहे. या ई-लर्निंगमुळे विद्यार्थ्यांना शिकविणे आणि समजून घेणे सोपे होणार आहे.


ई-लर्निंग शिक्षण पद्धती आज खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळात उपयोगात आणली जाते. आपण जे शिकत आहोत ते विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पडद्यावर दिसत असल्याने त्यांना अभ्यासक्रमाचे आकलन होण्यास खूप मदत होते. इंडो-काऊंट फौंडेशनमुळे आता नगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही ही सुविधा लाभली आहे.
- विष्णूपंत मगर, मुख्याध्यापक
संत रोहिदास विद्यामंदिर, कागल.


‘ई-लर्निंग’अभ्यासक्रम
पहिली ते सातवीपर्यंतचा सर्व अभ्यासक्रम संगणकाच्या साह्याने मोठ्या पडद्यावर सचित्र आणि प्रत्यक्ष लाईव्ह पद्धतीने मांडला आहे. उदाहरणार्थ, भूगोल विषय शिकविताना पृथ्वी आणि हवामानाची माहिती पाठ्यपुस्तकाप्रमाणे प्रत्यक्ष पृथ्वी, पाऊस, डोंगर, समुद्र यांचे लाईव्ह चित्रीकरण विद्यार्थ्यांच्या समोर उभे राहते. तसाच प्रकार शेती, बाजार, कथा-कविता याबद्दल आहे.

Web Title: E-learning facility in schools in Kagal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.